वारी लंडनची....

आँक्टोंबर - २००६:
लंडनला जायचे - जायचे म्हणत जायचा दिवस उजाडला. दुपारी १२.३० ची फ्लाइट, मुंबई ते लंडन [हिथ्रो]. मनात मात्र मंदार काळेंची 'सह्याद्रिला विसरु नको' वादळ निर्माण करीत होती।

व्हिसा स्टँप झाल्यावर एकच धावपळ उडुन गेली |
भवितव्याच्या स्वप्नांनी रे तहान हरवून गेली ||
भेटी झाल्या, खरेदी झाली, बॅग सुध्दा भरुन झाली |
सारख्या सुचना देता देता आईची धांदल उडून गेली ||
तासामागून तास गेला अन् फ्लाइटची वेळ जवळ आली |

निरोप द्यायला विमानतळावर सवंगड्यानी गर्दी केली ||
कौतुक आणि काळजी बाबांच्या चेह-यावर दिसून गेली |
पाठ फिरता तुझी, त्यांची पापणी सारं बोलून गेली ||
आपली माती, आपली माणसं, देश आपला विसरू नको |
सिलिकौन वॅलित जा... पण सह्याद्रिला विसरु नको ||१||

विमान उडलं तेव्हा एकेक डोळा पाण्यानं भरला असेल |
अगदी अखेरच्या क्षणी मित्रा मनानं बंड केलं असेल ||
नकोच जायला परदेशात, एकदा तरी वाटलं असेल |
अरे आकांक्षाच्या पंखानाही जखडून टाकलं असेल ||
लिंकनचे शब्द आठव अश्रू ढाळायला लाजू नको |
गीतेतलाही उपदेश आठव हातपाय गाळून बसू नको ||
अरे अटकेपार झेंडे लाव, पण माय मराठी विसरु नको ||२||

अरे अन्न दिलं, वस्त्र दिलं, सह्याद्रीनच ओसरी दिली |
आईबापानं कष्ट करुन ज्ञानाची भरुन शिदोरी दिली ||
गुरुजनांनी संस्कार दिले, गावक-यानी यारी दिली |
अरे टपरीवरच्या आप्पानही वेळोवेळी उधारी दिली ||
देश सुटला पोटासाठी, बंध इथले तोडू नको ||३||


... इमिग्रेशन काउन्टर कड़े जाताना मी परत परत पाठीमागे वळुन पहात होतो.... नुकतीच मला "बा" म्हणायला शिकलेली माझी छोकरी मला हसत - हसत "बाय-बाय " करत होती.... मी ही खोट हसू आनुन तिला बाय केला... थोड्याच वेळात इमिग्रेशन प्रोसेस संपवुन मी त्या "ना ईधरका - ना उधरका " झोन मध्ये पोहोचलो....

क्रमश: ...


...भुंगा!