रायरेश्वर ट्रेकच्यावेळीच केंजळगडचा ट्रेक नक्की झाला होता... शिवाय रायरेश्वराच्या अगदीच सामने असल्यामुळे रस्ताही ओळखिचा झाला होता... मात्र यावेळी चार-चाकी सोडुन दोन-चाकीचा बेत करायचे ठरले.... आणि मलाही माझ्या बुलेटला गडाची वारी करवायची होती... झाले..!!
कुणाल [पल्सर], चंदु [पल्सर] आणि अभय [सुझुकी सामुराय = नो प्रोब्लेम बाईक] या "बाईक ट्रेक" साठी तयार झाले!

सकाळी येरवाळीच प्रवासाला सुरुवात केली.... सातारा रस्ता एक तर हायवे त्यात सकाळी - सकाळी रिकामा.. मग काय... आम्ही भन्नाट निघालो... भोरमध्ये नाष्टा करुन आम्ही पुढे निघालो... जांभुळवाडी गावापर्यंत रस्ता ठीक होता.. आणि तेथुन पुढे आमची खरी वाट लागली.... दगडी - मुरमाड रस्ता आणि वळणा-वळणाची वाट.. आम्ही एका पाठीमागे एक ...सांभाळत...थांबत... आम्ही पुढे जात होतो... कुणाल आणि चंदु आपापली पल्सर सांभाळत पुढे आणि मी बुलेची ताकद आजमावत आणि अवाढव्य वजन सावरत ... तिला सांभाळत.. पाठीमागे...!!

अंदाजे तीन-चार कि.मी. चा हा रस्ता... रायरेश्वर आणि केंजळगडासाठी एकच आहे... "नो ओव्हरटेकींच्या" बोर्डाजवळ गाड्या लावुन आम्ही रायरेश्वराला नमस्कार घातला... डाव्या-हाताला केंजळगड [मोहनगड / टोपीगड] आमची जणु वाटच बघत होता... गडाकडे जाणारा रस्ता झाडा-झुडुपांनी वेढलेला आहे.. त्यामुळे चुकण्याची जरा जास्तच शक्यता आहे... पावसाळ्यात हा ट्रेक न करणेच चांगले... !!

गडाच्या थोडे अलीकडे काही गाई आणि बक-या चरत होत्या... आमचे ते रंगबिरंगी कपडे पाहुन ते जास्तच जवळ येऊ लागले... झाली पंचाईत!! पळावे म्हटले तरी जागा नाही... धाडस करुन आम्ही तिथेच जरा शांत बसुन राहिलो... नशीब म्हणा... थोड्या वेळाने ते सारे पुढे गेले... जिवात जीव आला.... नाही तर काय... ??
गडाच्या सुरुवातीलाच असणारा भला मोठा कडा आमच्या कडे बघुन जणु आव्हाणच देत होता... वाटले हा कडा पार करुन जायचे असेल... पण नाही... जरा शोधल्यावर गडाला अगदी लागुन जाणारी एक पाउलवाट दिसली... तिही तितकीच छोटी... घसरले तर सरळ खालच्या गावात...!

सांभाळत.. एकमेकांना धीर देत आम्ही पुढे चालत होतो आणि गडाच्या भिंती आमच्या बरोबर... दरवाजा अजुनही आम्हाला दिसत नव्हता... एव्हाना ऊनही आपली उपस्थिती दाखवु लागले होते... जवळचे पाणी कधीच संपले होते... आता गडाचा दरवाजा शोधण्यापेक्षा पाणी शोधणे गरजेचे वाटु लागले... एका ठीकाणी थेंब - थेंब टपकणारे पाणी सापडले... पाण्याची बाटली त्याखाली ठेऊन भरुन घेतली... खाली साचलेले पाणी डोक्यावर ओतुन घेतले आणि आगे बढ सुरु...! काही अंतरावरच किल्ल्याच्या दरवाज्याकडे जाणारी वाट सापडली... दगडी कातळात खोदुन ही वाट बनवली आहे.... सुरुवातीला भेटलेला तो कडा आणि हा दरवाजा अगदी एकमेकांच्या विरुध्द आहेत.... !!

पाय-या चढुन आम्ही गड माथ्यावर आलो... सगळीकडे हिरवेगार पठार... सुरुवातीलाच एक भग्न मंदिर आपले अस्थित्व आजही सांभाळुन आहे... एवढ्या पावसात.. ऊन - वा-यात हा देवही उभा आहेच ना.... उगाचच आपण [माणुस जातीचा प्राणी..] सुखाच्या मागे धावत असल्याची जाणीव करुन देत..!!
मध्यभागी एक कोठारवजा खोली आपली हजेरी लावुन आहे... दोन ठीकाणी चुण्याची घाणी आहेत.. बाकी काही नाही.....!!

दुरवर आम्ही पार्क केलेल्या आमच्या गाड्या दिसत होत्या.. अगदीच नखाएवढ्या...!! सोबत आणलेले पोहे - बिस्कीट त्या खोलीत बसुन चुपचाप खाल्ली.... सभोवतालचे फोटो काढले आणि परतीची वाट धरली...गाडीजवळ परत येईपर्यंत पायाच्या सांध्यांचा जणु खुळ-खूळा झाला होता... आणि त्यातच परत गाड्या घेऊन खाली उतरायचे.....च्या मायला...!
हळु-हळु म्हणा नाहीतर डेड-स्लो म्हणा.. कसेबसे खाली आलो... आणि पुण्याची परतीची वाट धरली... रस्त्यात एका ढाब्यावर मस्त गावरान चिकनवर [कोल्हापुरी] ईथेच्च ताव मारला आणि घराकडच्या ट्रेकला सुरुवात झाली....
फोटो पहा..!!
...भुंगा!
२ टिप्पण्या
parantu khup varsh jhali parat kahi plan nahi ka ?