भटकंती: तोरणा ते राजगड



सप्टेंबर २००४ मध्ये राजगडचा ट्रेक केला होता... आणि गेल्या पावसाळ्यात तोरणा .. मात्र एकाच ट्रेकमध्ये दोन्ही किल्ले पाहण्याचे [ धाडस! ] मी, विशाल आणि कुणालनी ठरवले ... आणि त्याप्रमाणे शनिवार - रविवार, दि २२-२३ डिसेंबरला - पौर्णिमेच्या रात्री आम्ही तोरणा चढलो ... मध्यंतरी तोरण्यावरच्या ब्रह्म पिशाच्या - विषयीही एकले होते आणि १-२ उदाहरणे श्री.प्र. के. घाणेकर सरांच्या "साद सह्याद्रीची ...." या पुस्तकातही सापडली.... म्हटले चला.. पाहु या तरी...!!

अंदाजे रात्री ८ वा. आम्ही तोरण्यावर पोहोचलो... उद्या [ रविवारी ] पौर्णिमा असल्याने आजही चंद्र पुर्णपणे आपले दर्शन देत होता.. गडावर चढताना अजुन तीनजण भेटले ... ज्ञानु, रोहित आणि सुशिल.. पुण्याचे इंजिनिअरिंग डिप्लोमाचे हे तीघे गड उतरण्याच्या तयारीत होते .. मात्र पहिलाच ट्रेक असल्याने थोडेसे गोंधळलेले होते.. शिवाय आजच पुण्याला परतायचे या विचाराने आलेले हे तिघे रात्री खाली उतरण्यासही थोडेसे धास्तावलेलेही...!! मी व विशालने त्यांना आमच्याबरोबरच रात्री थांबुन सकाळी सुरक्षित गड उतरण्याचे सुचवले... आम्हाजवळ असणा-या खाण्या-पिण्याच्या व राहण्याच्या साहित्याची मदत करण्याची आम्ही तयारी दाखवल्यावर ते तयारही झाले.. चला... अजुन तीनजण सोबत झाले... !

गडावर पोहचुन आम्ही तोरणाई व मेंगाई देवीचे दर्शन घेऊन आपला बिस्तारा मांडला आणि शेकोटीसाठी थोड्या लाकडांची जुळवा-जुळव ही केली... एव्हाना पुण्यातल्या नामांकीत आय-टी कंपनीतले पाच लोक रात्रीच्या मुक्कामाची तयारी करुन वरती आले होते... थोडयाशा हाय-हैलो व ओळख-पाळखीनंतर आमची बैठक शेकोटीसमोर चांगलीच रंगली... रात्री अंदाजे १० - १०.३० ला बेळगावचा २०-२२ लोकांचा एक मोठा ग्रुप आरोळ्या व घोषणा देत राजगडावरुन तोरण्यावर पोहोचला .. त्यांच्या घोषणा ह्या राजगडावरुन तोरण्यापर्यंतचा प्रवास सफल केल्याचा आनंदच व्यक्त करत होत्या... मात्र गडावरील शांतीचा भंग होऊ नये म्हणुन त्यांना शांत व्हायला सांगुन आम्ही पुन्हा शेकोटीसमोर बस्तान मांडले आणि त्या बेळगांव वाल्यांनी आपल्या खाटाल्याच्या जेवणाची तयारी सुरु केली...!

शेकोटीसमोर आम्ही "त्या ब्रह्म - पिशाच्या" गप्पा मारु लागलो... पहिल्यादाच ट्रेक आणि गडावर येणारे ते डिप्लोमाचे तिघे अगदी मन लाऊन हे सारे ऐकत होते.. शिवाय ज्ञानु तर मला खोदुन - खोदुन त्या बद्दल विचारत होता...!

रात्री १२.३० पर्यंत वाट पाहुनही आम्हाला ते ब्रह्मपिशाच्च दिसले नाही .. किंवा त्याची जाणीवही झाली नाही... कदाचित आमच्याच आजुबाजुला बसुन ते आपलेच कथन ऐकत असेलही .. नाहीतर पिशाच्चे सर्वांना थोडीच दिसतात...!! ... गंमत केली ... अशा गोष्टींवर किती विश्वास ठेवायचा हे आपणच ठरवायला हवे, नाही का?

जेवणाचे भरपुर सामान आणि सोबतीला एक कोंबडी अशी जेवणाची जय्यत तयारी करुन आलेला हा ग्रुप गड पहायला आलाय की पिकनिक करायला असा प्रश्न स्वाभाविकच मला पडला... गडभेटीला तुम्ही कोंबडी वगैरे कसे काय नेता राव..? .. अर्थात त्या बरोबर बाटली ही आणलीच असेल नाही का? .. असेलही कदाचित ... त्यांच्या जेवणाची तयारी होईपर्यंत आम्ही झोपायची तयारी सुरु केली होती... सकाळी लवकर उठुन सुर्योदय बघायचा होता ना.. आणि शिवाय राजगडाच्या दिशेने आगेकुच ही ..!!


सकाळी सुर्योदय पाहण्याचे भाग्य फारच कमी ... नाहीतर पुण्यात - चारी बाजुला वाढलेल्या सिमेंट्च्या जंगलात- सुर्योदय आणि सुर्यास्त कधी आणि कोणत्या दिशेला होतो हे पाहणे दुर्मिळच ..! मेंगाईदेवीच्या समोरच्या बुरुजावरुन राजगडावर होणारा सुर्योदय अगदी डोळ्याचे पारणे फेडणारा ...!! हळुहळु वर येणारा तो तेजोगोल पाहताना अखंड आणि अवर्णनिय अशा आनंदाची अनुभुती होते ... आता हे अवघड शब्द आणि त्याचा अर्थ समजायचा असेल तर तोरणा भेटीशिवाय पर्याय नाही ..!

पटापट उगवणा-या सुर्याचे फ़ोटो काढुन घेतले .. त्यात कुणालचे, अर्थातच, फ़ोटो सेशन ही आलेच... ओघाने.. असो..!

तोरण्याच्या बुधला माचीवरुन राजगडाच्या संजीवनीमाचीवर जाण्यासाठी एक कच्चा रस्ता आहे.. तसा थोडासा अवघड, निसरडा हा रस्ता निर्जन आहे.. रस्त्यात एखादा ट्रेकर भेटला तरच नाहीतर पाच-साडेपाच तासाचे हे अंतर तुमच्या सहनशिलतेचा अंत पाहण्यासाठी पुरेसा आहे... रस्त्यामध्ये पाण्याची सोय नाही... म्हणजे स्वतःजवळ असलेले पाणी जपुन वापरा एवढेच सांगणे... तसे रस्त्यात चार - पाच उंब-याची एक वाडी लागते... आमच्या जवळचे पाणी संपत आल्याने आम्ही या वाडीवाल्या एका घरातुन पाच रुपयाला एक बाटली या प्रमाणे पाच बाटल्या भरुन घेतल्या व एक-एक कप चहाही... शहराच्या धकाधकीपासुन दुर हा भाग फारच मागासलेला ... दारात एक कोंबडी आपल्या पिलांना जवळ करुन खायला भरवत होती... आईचे प्रेम सर्व प्राण्यांत सारखेच... नाही का?

थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही राजगडाकडे पुन्हा चालायला सुरुवात केली.. एव्हाना सुर्य बराच वर आला होता... अंदाजे दुपारी १२ वाजता आम्ही संजीवनी माचीवर पोहोचलो... संजीवनी माचीवर पोहोचलो तेंव्हा पोटातील कावळे मेले की काय असे वाटायला लागले होते... जवळचाच एक आडोसा पाहुन आम्ही चुल पेटवली आणि "दोन-मिनिटवाली - मॅगी" बनवली... तसे घरी असल्यावर मी मॅगीकडे चुकुनसुद्धा पहात नाही ... मात्र पोट भरण्याचा हा मार्ग फारच सोपा आणि सोयिस्कर असल्याची जाणीव मला या ट्रेकच्यावेळी झाली.... पोट भरुन झाल्यावर स्वीट-डीश म्हणुन आम्ही चहा ठेवला.... मात्र गाळण घरीच विसरल्याने, न गाळताच कडक चहा पिलो.... असा कडक चहा या आधी कधी पिल्याचे मला आठवत नाही.. काहीही असो.. तो चहा मात्र फक्कड झाला होता...!

गडावर आज जरा जास्तच लोकं दिसत होती... थोड्या वेळानं लक्षात आलं की - राजगडावर - एक, "राजगड - पदभ्रमण" शिबीर चालु आहे... आपल्या इतिहासाबद्दल जाणीव करुन देण्याची ही पद्धत फारच प्रभावी वाटली... एखादे-दोन परदेशी पाहुणेसुद्धा नजरेस पडले... काही महिला आपल्या लहानग्यांना घेऊन या शिबिरात सहभागी झाल्या होत्या ... एवढ्याशा वयात त्या लहानग्यांना गडावर पळताना पाहुन कळत-नकळत का होईना मला त्यांचा हेवा वाटला.... कारण स्वाभाविकच होते... आमच्या सारख्यांना बराच वेळ लागला - गड - किल्ले, आणि आपला इतिहास समजुन घ्यायला... मात्र ही बालके जीवनाच्या सुरुवातीलाच हे सारे अनुभुत होती....!!

राजगडावर ब-यापैकी फिरुन झाले.. पुन्हा एकदा फोटो काढुन झाले .... सुर्य आता मावळतीकडे झुकला होता आणि पौर्णिमेचा चंद्र आकाशात वर चढु लागला होता... पौर्णिमेचा हा काळ - सुर्य मावळतीला आणि चंद्र उगवतीला असताना दोघांना पाहणे अगदी दुरापास्त आहे.... पुण्यातुन तरी हे शक्य वाटत नाही...!
... वेळेचा ईशारा समजुन आम्ही गड उतरायला सुरुवात केली.... हळु - हळु... गप्पा मारत... पद-भ्रमणाच्या शिबिराला आलेले काही आजोबा लोक अजुनही राजगड चढत होते.... त्यांच्याबरोबर काही तरुणही हाश्श.. हुश्श करत चढत होते... तो सीन पाहुन जुण्या - झंडु च्यवनप्राशच्या जाहिरातीची आठवण झाली..... आठवली का..? "साठ साल के बुढे - या साठ साल के जवान ..!" .. बरोबर!!

गडाच्या पायथ्याशी असलेल्या गुंजावणे गावात थोडे खाऊन मग पुण्याचा रस्ता पकडायचा बेत होता.. मात्र शेवटची बस गेल्याने... त्या वेळी हजर असलेल्या दुधाच्या गाडीने आम्ही खेड शिवापुरला आलो... आता मात्र जेवल्याशिवाय पुढे जाणे कठीण होते, म्हणुन तिथेच एका होटेलमध्ये इथेच्च खाऊन घेतले आणि मग पुण्याकडे आमचा दौरा सुरु झाला... अंदाजे रात्री ९ वाजता पुण्यात पोहोचलो ... ९.३० ला घरी.... मस्तपैकी अंघोळ करुन निद्राधिन ...!!

माझ्या किल्ल्यांच्या एकंदरीत प्रवासामध्ये ब-याच गोष्टी मला शिकायला मिळाल्या... काही नवीन .. काही जुन्या - पुन्हा नव्या झालेल्या.... इतिहासाचे अनेक - चांगले वाईट पैलु .... आणि हीच माझी शिदोरी आहे..!

मात्र ब-याच ठीकाणी मला काही तरी चुकीचे आहे - होत आहे याची जाणीवही झाली.. गडांवर जाताना मी ब-याच लोकांना पिकनिकला गेल्यासारखे वागताना पाहिलय... जसे -


राजमाचीच्या ट्रेकच्या वेळी, अगदी एक ग्रुप- अंदाजे १७-१९ वयातला असावा... गडावर गाणी लाऊन नाचत होता.. सोबतच्या मुलीही मोठ्-मोठ्याने ओरडुन त्या नाच्यांना प्रोत्साहित करत होत्या ... हे गड - किल्ले आपली संस्कृतीची आधारस्थाने आहेत.. मंदिरे आहेत याची जराही जाणीव या गाढवांना कशी असु नये?

हरिश्चंद्र गडावर एक ग्रुप पिऊन एवढा धुंद होता की विचारु नका... यांचा मोरक्या तर अक्षरश: विवस्त्र - हो... अगदी विवस्त्र .. होऊन शेकोटीसमोर नाचत होता...

एका आय-टी कंपनीचा [माझ्याकडे यांचा व्हीडीओ शुट आणि फोटो सुध्दा आहेत] भला मोठा ग्रुप या ठीकाणी आपल्या कामगारांची "कसली तरी" परिक्षा घेत होता.. आणि त्या अंतर्गत ४-५ लोकांचा एक असे पाच-सहा ग्रुप जोर-जोराने "अल्फा - बीटा" असे ओरडत पळत होते... काय म्हणावे यांना...? हजारो वर्षांच्या जुन्या आणि पवित्र ठीकाणी तुम्हाला तुमच्या असल्या परीक्षा घेताना लाज नाही का वाटली..? ... तोंड वर करुन पळणारे ती माकडे त्या जागेचे पावित्र्य नष्ट करताहेत.. याची साधी जाणीवही होऊ नये..?

त्यांच्यातल्या एका महान गाढवाने सिगारेट पिऊन ते थोटुक वाळलेल्या गवतात निर्लज्यपणे फेकुन दिले आणि एक्-दोन मिनिटातच तिथे आग लागली... हे घडले ते मुख्य गणपती गुहेच्या वरती..!

.... ...... अहो, तुम्हाला असलेच प्रकार करायचे आहेत तर त्यासाठी अनेक ठीकाणे आहेत... मात्र गडांवर- किल्ल्यांवर, मंदिरांच्या जागी जाऊन असला प्रकार करु नका... इतिहास आणि संस्कृतिचा अभिमान असणा-यांच्या सहनशिलतेचा अंत पाहु नका...!


... किल्ल्यावर कशाला जातोस... काय राहिले आहे तिथं आता? ... अनेकवेळा मला विचारला गेलेला हा प्रश्न ... याचं उत्तरदेण्यासाठी मी श्री. प्र. के. घाणेकर सरांच्या "साद सह्याद्रीची... भटकंती किल्ल्यांची" यापुस्तकातील हा उतारा देतोय ...


किल्ल्यावर जावंच कशाला?
या प्रश्नाला उत्तर एकच, "किल्ले आहेत म्हणुन तेथे जावं." पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजेआपल्या भुगोलाला पुढील अनेक पिढ्यांनी गौरवानं-अभिमानानं सांगावं असा इतिहास जिथंघडला तिथं जाणं अगत्याचं आहे, प्रत्येक महाराष्ट्रीकाचं ते आद्य कर्तव्य आहे. पण तिथंजाताना तिथल्या इतिहासाची आपल्याला जाणीव हवी. नाहीतर आज तिथं दिसतीलढासळलेले बुरुज, माना टाकलेल्या कमानी, पडलेली तटबंदी अन ओहोरलेली टाकी. पण हीचती ठीकाणे जिथे इये देशीचे पुत्र ताठ मानेने वावरले आहेत. जगण्यातला अर्थत्यांच्या मरणाने आपल्याला मिळाला आहे. उत्तरेकडचे किल्ले धड उभे आहेत. त्यांच्यादगडादगडावर कोरीव काम आहे अन आतल्या भिंती, वाडे, दालने शाबुत आहेत. पण त्याचीकिंमत..? फ़ार भयानक किंमत देऊन हे सारं टिकवलं गेलं आहे! आपल्यामुलीबाळी परधर्मीय जुलमी सत्ताधिशांच्या घरी लोटाव्या लागल्या. नावांत सिंह अनकिताबाने राजे असणारे या किल्ल्याचे माल्क आपली धनदौलत, अब्रु आणि मुख्यम्हणजे स्वातंत्र्य त्या सत्तांध - धर्मांध सुलतानांकडे गहाण टाकुन आले होते. म्हणुन हे असे राहिले! शोकेसमध्ये ठेवलेल्या या नटव्या बाहुल्याच.

पण महाराष्ट्रातल्या या रांगड्या किल्ल्यांच तसं नाही. इथले भग्नावशेष हीच या किल्ल्यांची महावीर अन परमवीर चक्रंआहेत. ज्याला आपण दुषण देतो तीच त्यांची भुषणं आहेत. आपल्या लढाऊ परंपरेची ही जिवंत स्मारकं आहेत. अगदी १९१८ च्या शेवटच्या इंग्लिश-मराठे युध्दातही सिंहगड, वासोटा, रायगडचे किल्ले भांडवल केले गेले. त्यात त्यांच नुकसानझालं. एकावर एक दगड ठेवुन हे किल्ले बांधले नाही गेले. मानसांची मने त्यांशी जखडली गेली होती. हे सारं दुर होण्यासाठी डिकीन्सन आणि एतरांनी बुध्द्याच हे किल्ले ढासळवुन टाकावेत, किल्ल्यावर जाण्याचे मार्गच तोडावेत व स्वातंत्र्याची कारंजी मुळात नष्ट करावीत असे मनी धरुन मोहिम मांडुन हे उध्वस्तीकरण केले. काही प्रमाणात इंग्लिशांना त्यात यशही आले. पण घामाचा पाऊसपाडुन अन रक्ताचा सडा शिंपुन ही दुर्गपुष्पे इये देशी वाढवली गेली-टिकवली गेली हे विसरुन चालणार नाही !


अधिक फोटो येथे आहेत ..!


...भुंगा!