२३ मार्च, हौतात्म्यदिनी शहिद भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांना सादर वंदन!


आमच्या विरुद्ध इंग्लंडचे बादशाह पाचवे जॉर्ज यांच्या विरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप ठेवण्यात आला होता आणि न्यायालयने आम्हाला त्या साठी फाशीची शिक्षा ठोठावली आहे. तेव्हा इंग्लंड नि हिंदुस्थान या दोन राष्ट्रात युद्ध सुरू आहे आणि आम्ही युद्धबंदी आहोत हे उघड होते. आमच्या काही पुढार्‍यांना सवलती देउन तुमच्या सरकारने आपल्या बाजुला ओढले नि त्यांनी तरुणांचा विश्वासघात केला याची आम्हाला चिंता नाही. ज्या स्त्रियांनी आपल्या सर्वस्वाची आहुती दिली आहे, पतीचे बलिदान दिले, भावाचा बळी दिला नि स्वत:चाही होम केला त्या आमच्या पार्टीच्या सदस्य आहेत म्हणून त्यांना त्या ’हिंसेवर विश्वास ठेवतात’ असे सांगुन हे राजकिय पुढारी आपल्या शत्रू समजतात. त्याचेही आम्हाला दु:ख नाही. पण तरीही हे युद्ध सुरुच राहील. स्वतंत्र आणि समाजवादी प्रजासत्ताक राज्य स्थापित होईपर्यंत हे युद्ध भडकतच राहील. आमचे बलिदान जतिंद्रनाथ नि भाई भगवतीचरण यांच्या बलिदानाने उज्ज्वल केलेल्या इतिहासाचा अध्याय मोठा करील. आपण आम्हाला फासावर लटकाविण्याचा निश्चय केलेला आहे, व तसे करणारच! आम्ही कधी आपलयाला विनंती केली नाही किंवा दयेचे भीक मागीतली नाही.

आम्हाला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे ती अशी की तुमच्या न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आम्ही युद्ध पुकारले होते व म्हणुनच आम्ही युद्धबंदी आहोत. तेव्हा आम्हाला युद्धाबंद्यांप्रमाणेच वागविण्यात यावे अशी आमची मागणी आहे. तुमच्या न्यायालयाने जे म्ह्टले तेच तुम्हाला मनापासून म्हणायचे होते हे सिद्ध करणे आणि ते कृतिने सिद्ध करणे हे आता तुमच्याच हाती आहे! आमची तुम्हाला अगदी मनापासूनची एक विनंती आहे आणि तुम्ही ती मान्य कराल अशी आशा आहे की, तुम्ही आपल्या सैनिकी विभागाला एक सैन्यपथक वा बंदूकधारी पथक पाठवुन आम्हाला गोळ्या घालुन सैनिकाप्रमाणे मारण्याचे आदेश द्यावेत. - शहिद भगतसिंग 


निशब्द अन् नतमस्तक,
भुंगा!