मग.. तुमचा नविन वर्षाचा "निग्रह" - रिझॉल्युशन - काय आहे?

दरवर्षी या वेळेला, म्हणजे वर्षाच्या शेवटी जवळ जवळ सारेचजण नविन वर्षासाठी काही ना काही प्लान करतात. काहीतरी नविन करण्याचा... काही असं जे आत्तापर्यंत/ यावर्षी करायचं राहून गेलं असं... आणि एक लिस्ट बनते.. [कदाचित] त्यालाच "न्यु ईअर रिझॉल्युशन" म्हणतात!



तसं मी ही काही अपवाद नाही. आतापर्यंत बरीच रिझॉल्युशन्स केली आणि थोडीच पुर्ण करण्यात धन्य पावलो. काही हरकत नाही, बाकीच्या पुढच्या वर्षासाठी! तर, आतापर्यतच्या लिस्टवरुन बनवलेली ही काही कॉमन रिझॉल्युशन्स!


१. व्यसन मुक्ती [स्मोकिंग / दारु]: अगदी सार्‍याच स्मोकर्सचं हे पेटेंट रिझॉल्युशन्स! वर्षभर सिगारेट लोढल्यानंतर जेंव्हा कधी मनात ती सोडण्याचा विचार येतो, तेंव्हा ३१ डिसेंबरची वाट पाहिली जाते. १ जानेवारी पासुन सिगारेट सोडण्याचे शपथेवर सांगितलं जातं. एक - दोन दिवसांतच हे रिझॉल्युशन्स पुढच्या वर्षापर्यंत 'तहकुब' करण्यात येतं! तेच दारुच्या बाबतीत म्हणता येईल. दारु सोडण्याआधी ३१ डिसेंबरला - गटारी करायची - मनसोक्त प्यायची आणि मग सोडायची असं एकंदरीत टार्गेट असतं!
दोस्त, चांगली आणि योग्य गोष्ट करायला नविन वर्षाची वाट कशाला पहायला हवी. कदाचित पुढचं वर्षच तुझ्यासाठी नसलं तर? रेमेंम्बर, स्मोकिंग किल्स!

२. फॅमिली बरोबर अधिक वेळ घालवणारः हां, आजकालच्या धकाधकीच्या जीवनात जिथं जेवायलाही वेळ नसतो तिथं फॅमिलीसाठी वेळ मिळणं कठीणच, नाही का?
लगेच हो म्हणु नका... आपण जे सगळं करताहात ते फॅमिलीसाठी असं जरी असलं तरी त्या फॅमिलीला आपण आणि आपली सोबतही हवी आहे हे विसरु नका म्हणजे झालं!

३. व्यायाम करणारः हसु नका... खरं तेच सांगतोय! पोटाचा वाढलेला तंबु नेहमीच व्यायाम करण्याबद्दल खुणावर असतो. त्यात घरचे - विशेषत: बायको - जरा जास्तच हटकत असते. किमान सकाळी वॉकला जाण्याबद्दल तरी तिची हक्काची मागणी असते. तसं आम्ही सुरुवात करतो, पण दोन-तीन दिवस, आठवडयानंतर आमची अवस्था - पालथ्या घड्यावर पाणी अशी होते.
सकाळी / संध्याकाळी वॉकला जाण्यासारखा व्यायाम नक्कीच करता येण्यासारखा आहे. किमान जेवणानंतर 'शतपावली' करा हवं तर!

४. दुसर्‍यांना मदत करणार - डोनेशन्स वगैरे: काही जण सोशल होण्यासाठीही नविन वर्षाची वाट पाहतात. दुसर्‍यांसाठी काहीतरी करायचय.. काय ते नक्की माहित नाही... मात्र इतरांकडुन ऐकुन/ वाचुन असंच काहीतरी करण्याची हुकी येते.. चांगलं आहे.. !
पण मित्रा, त्यासाठी कशाची आणि कुणाची वाट पहायतोय? रेमेंम्बर - देअर इज नो राँग टाईम टु डु अ राईट थिंग!

५. वजन कमी करणारः पुन्हा एक नविन चॅलेंज. ऑफिसमध्ये - ए.सी. मध्ये बसुन म्हणा किंवा चटर-पटर खाऊन म्हणा, पोटाचा नगारा वाढतोच, पण त्याचबरोबर वजनही. शिवाय व्यायामाच्या नावाने शंखच असल्याने वाढत्या वजनावर कंट्रोल ठेवणे अवघड जाते. मग हा प्वाँईंट या यादीत जातो.
स्नॅक्स, चटर-पटर खाण्यावर हळु-हळु का होईना पण अंकुश ठेवणे गरजेचं आहे. नाहीतर वजनवाढीबरोरच - बी.पी आणि हार्ट अटॅकलाही आमंत्रण आहेच!

६. काहीतरी नविन शिकणारः पण काय ते नक्की नाही.. कदाचित गिटार किंवा तबला वाजवायला शिकायचय! टेक्निकली नविन काही शिकेन... पोहायला?... की नविन भाषा शिकु.. जापनिज - जर्मन सध्दया चांगल्याच फार्मात आहेत!
भाऊ, काहीही शिक.. शिक्षण/ कला कधी वाया नाही जात. फक्त शिकायचंय म्हणुन लिस्टवर नको सोडु, एक प्रामाणिक प्रयत्न कर!

७. कर्ज 'निल' करणारः हम्म.. पर्स्नल लोन, कार लोन, होम लोन अशी बरीच "लोनची" लफडी मागे असतात. पुढच्या वर्षी यातील एकाचा तरी निकाल लावायचाच!
कितीही ईजी इंस्टालमेंट्स असल्या तरी कर्ज हे कर्जच असतं. थोडीशी बचत करुन, थोडीशी काटकसर करुन हे कर्जाचं भुत उतरवायलाच हवं!

८. एक लाँग हॉलिडे: फॅमिलीला वेळ देत नाही असे टोमणे ऐकुन किंवा स्वत:साठीही थोडा चेंज आणि आराम म्हणुन बरेच लोक हा प्लान करतात. आता काहींना सुट्टी मिळते, काहींना मिळत नाही. काही प्लान परदेशातला सुट्टीचा बनवतात तर काही भारतातच.
प्लान मस्त आहे! छोटा असला तरी चालेल, पण फॅमिली बरोबर ठरवला असेल तर तो पुर्ण "कौंटुबिकच" असावा. त्यात सोबत लॅपटॉप.. मग मेल चेकिंग.. शेअर मार्केटवर नजर अशा गोष्टी जरावेळ दुरच ठेवा!

९. प्रमोशन / नविन नोकरी: बस्स यार.. खुप दिवस झाले, आता नविन नोकरी शोधु.. आय नीड अ चेंज असं वाक्य बर्‍याचदा ऐकण्यात येतं. मग पुढच्या वर्षी नविन नोकरी बघायचीच असा मनसुबा बनतो.
हां, चेंज इज लाईफ हे सर्वांनाच माहिती आहे, मात्र असा काही प्रकार करु नका ज्याने लाईफ चेंज होईल.

१०. पुढच्या वर्षी 'प्रेमात पडायचं!': माफ करा, कदाचित - 'गर्लफ्रेंड बनवायचीच' असा प्लान असेल.. कदाचित 'बाबा ... लगिन!' असं आई-वडिलांना रेमाइंड करायचं.... एकंदरीत - जीवनसाथी सोधायचा... बस्स झालं एकटं - बॅचलर लाईफ!
प्लान मस्त आहे, शुभेच्छा!

हां, तर असेच काही प्लान्स/ रिझॉल्युशन बनतात. कदाचित यापेक्षाही जास्त असतील.... तुम्ही सांगालच ना? थोडक्यात - देअर विल अलवेज बी अ ३१स्ट डिसेंबर! आणि हो, ३१ डिसेंबरला मी तर घरीच असणार आहे... तुमचा काय प्लान आहे?

मुळ ग्राफिक्स.