मी, कॉल-सेंटर आणि नाईट शिफ्ट!

परवा सुहासच्या ब्लॉगवर त्याच्या नाईट-शिफ्ट बदल - बद्दल वाचलं... तेंव्हा वाटलं की आपणही यावर एक पोस्ट टाकावी. म्हणुन हा खटाटोप! आय.टी. मध्ये "नाईट शिफ्ट" हा प्रकार तसा नविन नाही... कॉल सेंटर वाल्यांसाठी तर तोच नोकरीचा भाग असतो. बर्‍याच आय.टी. वाल्यांना कधी-ना-कधी तरी हा सुदैवी मोका मिळतोच!


तर... डे-जॉब मध्ये येण्याच्या आधी जवळ - जवळ तीन वर्षं मी नाईट शिफ्ट केली. खरंतर माझ्या करीयरची सुरुवातच नाईट-शिफ्ट मध्ये - नेटवर्क इंजिनिअर म्हणुन - सुरुवात केली. त्यानंतरही डे जॉब आणि परत ३ वर्षे नाईट! त्यावेळी आमची शिफ्ट दुपारी ३.३० ते रात्री १२.३० अशी असायची.. मात्र १२.३० ऑफिसातुन सुटणं कधीच झालं नाही. बर्‍याचदा २.३० किंवा ३.३० च्या शेवटच्या ड्रॉपनं घरी यायचो... ४.३० पर्यंत घरी पोहोचायचो आणि मग निवांत झोप... अगदी दुपारी १२ वाजेपर्यंत! मग दिवसाची सुरुवात आणि परत ३.३० च्या शिफ्टसाठी तयार! नाईट शिफ्टमध्ये पिक-अप आणि ड्रॉप ही मला सर्वात आवडलेली सोय... उन्हाळा - हिवाळा किंवा पावसाळा.. अगदी टेंन्शन नाही.... गाडी दारात!

त्याकाळी अगदीच निशाचर झालो होतो.. जस - जसा अंधार पडू लागायचा.. तस - तसं फ्रेश वाटु लागायचं! ऑफिसमध्येच ब्रेकफास्ट - डिनर मिळायचं.. चालणं - व्यायाम अशा प्रकारांना वेळच नसायचा. वरुन पार्ट्याही व्हायच्याच.. खाण्या - पिण्याची चांगलीच चंगळ असायची... चांगला ८३ किलो वजनाचा झालो होतो! मात्र डे-जॉबमध्ये आल्यानंतर, ट्रेक वगैरे करत - करत ती "चरबी" उतरवली. शिवाय "टेंशन" च्या नावाखाली म्हणा - बिड्या [सिगारेट म्हणु..?] फुकायचीही सवय जडली होती. कोणत्याही ऑफिसात असे "फुके" सर्वात आधी मित्र बनतात - माझा अनुभव आहे! काही लोकांना तर मी अगदी टाईम ठरवुन - उदा. रात्री ७.३०, ९.३०, १२.३० आणि मग शिफ्ट संपल्यावर..असं.. सिगारेट पिताना पाहिलंय. बर्‍याचदा यामध्ये मुलीही असायच्या!

शिफ्ट संपल्यानंतर बर्‍याचदा आम्ही स्वारगेट ला सकाळी - सकाळी चहा - पोहे खात असु.. कधी स्टेशनवरती चहा - क्रीमरोल - तर कधी तिथंच कमसम मध्ये! रात्री अशा कॉल-सेंटरच्या गाड्यांवर लक्ष ठेवणारेही काही लोक असायचे.. म्हणजे गाडीवाल्यांनी टॅक्स भरलाय की नाही ते तपासायला..! ड्रायवरला मात्र त्या लोकांच्या थांबायच्या जागा माहिती असायच्या.. कधी काळी सापडलाच तर आमचीही अ‍ॅक्शन - स्पीड - ड्रायव्हिंगची सफर व्हायची! शेवटच्या ड्रॉपला असलो कि त्या ड्रायव्हर बरोबर गप्पा मारणं हे अनिवार्य असायच... हो.. म्हणजे त्यानं जागं राहुन गाडी चालवावी म्हणुन.. कीती तरी वेळा त्याला चालु गाडीत - जागा केलाय!!

एकदा आमच्या गाडीच्या ड्रायवरनं सांगितलेला किस्सा फार मजेशिर होता. पुण्यात कॉल-सेंटरची नुकतीच सुरुवात झाली होती आणि हा गाडीत तीन मुली आणि एक मुलगा असे ड्रॉपसाठी चालले होते. रस्त्यात एक पोलिसानं हटकलं आणि विचारलं की एवढ्या रात्री कुठं चाललात? ड्रायवरनं सांगितलं की या लोकांना घरी सोडायला चाललाय. तर कुठुन आलात - काय करता वगैरे विचारल्यावर त्यातलीच एक मुलगी म्हणाली कि, आम्ही कॉल-सेंटरमध्ये काम करतो. बस्स तेवढंच ऐकलं आणि म्हणाले - "लाज नाही वाटत - तोंड वर करुन सांगायला - कॉल-सेंटर मध्ये काम करतो?".... झालं! त्या मुलीलाही कळालं की साहेबांचा काही - तरी "गैरसमज" झालाय.. मग त्यांना "कॉल-सेंटर - गर्ल्स" मधला फरक समजावता समजावता बिचारी स्वतःच रडायला लागली!

नाईट शिफ्टच्या काळात बरेच लोक "टेक्निकल - सपोर्ट" किंवा "बिझनेस डेव्हलपमेंट" या खात्यात असायचे. आमची - डेवलेपमेंट टीम - उगाच या सर्वात वेगळी दिसायची! बर्‍याचदा री-क्रीशन रुम/ कॅफेटारीयामध्ये या सपोर्ट आणि सेल्स वाल्याच्या गप्पा रंगायच्या. मुलीही अगदी मुलांप्रमाणे "काय चु** क्लायंट होता...".. "दिमाग की मा*** कर दी.."..."मेरी तो *** गयी" अशी वाक्ये अगदी बिंधास्त वापरायच्या! कधी - कधी कॉल करणारे किती टेक्निकल असतात यावर चर्चा व्हायची. उदा. टेक्निकल सपोर्ट वाल्यानं एकदा समोरच्या बाईला सांगितलं की "मॅम, प्लीज क्लिक - राईट क्लिक ऑन माय-कंप्युटर"... तर तिकडुन उत्तर आलं..."आर यु नट्स? हाऊ कॅन आय क्लिक ऑन योर कंप्युटर?".

या सपोर्ट आणि सेल्स मध्ये काम करणार्‍यांची नावंही अगदी विदेशी असायची. त्या देशातील नावाप्रमाणं, "आनंदचा - अ‍ॅन्डी", "गणेशचा - ग्लेन" तर "संदीपचा - सँडी" व्हायचा. ही नावं त्यांना एवढी घट्ट चिकटलेली असायची की त्यांना बर्‍याचदा त्यांच्या खर्‍या नावाचाही विसर पडायचा. पण फक्त नाव बदलुन वा इंग्लिश एक्सेंट मारुनही कधी - कधी तर त्यांच्या बोलण्यावरुन समोरचा ओळखायचा की हे लोक भारतातुन बोलताहेत. मग उगाचच ऑफिसचा पत्ता विचारणं, कसं यायचं यासारखे प्रश्न विचारले जायचे... आणि यात सापडला तर एक इंग्लिश शिवी झाडुन फोन ठेवुन द्यायचे.

नाईटशिफ्टच्या त्या सायकलचा एवढा जबरदस्त परीणाम - मनावर आणि शरीरावर झालेला कि, कधी शनिवारी बॅंकेत - बिल भरायला वगैरे गेलं तर त्या लोकांना काम करताना पाहुन विशेष वाटायचं... एवढ्या सकाळी/ दिवसा कसं काय काम करतात हे लोकं? त्या जवळ-जवळ तीन वर्षात बरंच काही मिस् झालं हे ही तितकच खरं! म्हणजे फॅमिली बरोबर सायंकाळी बाहेर जाणं.... सायंकाळचा एखादा सिनेमा.... मुलीबरोबर [वेदिका - त्यावेळी १ वर्षाची असेल ] खेळणं वगैरे.. वगैरे! कारण मी ज्यावेळी घरी यायचो, त्यावेळी ती झोपलेली असायची... आणि मी उठायचो, त्यावेळी तिच्या झोपायची वेळ असायची!

आता मात्र डे-जॉब मध्ये जावं असं वाटु लागलं होतं.. शिवाय त्यात आणखी एक भर पडली म्हणजे - एका ऑफिसवाल्यानं सांगितलं की त्याच्या एका मित्रानं तडका-फडकी राजीनामा दिला.. कारण... तर तो नेहमी फिरतीवरच असायचा - देश विदेश बरेच दिवस बाहेरच... मुलगा झाला.. पाहुन परत ऑनसाईट... त्या नंतर बर्‍याचदा येणं जाणं चालुच होतं... मुलाची आणि त्याची क्वचितच भेट व्ह्यायची - परत आला तर मुलांनच त्याला सांगितलं - "अंकल, पापा नही है...! " .. बिचारा.. समजुन चुकला - आपण काय मिस् केलं!

काही दिवसातच मीही डे जॉब शोधुन कल्टी.कॉम केलं... !

.... हम्म तर असं हे - नाईटशिफ्ट - कॉल सेंटर कथासार! मी अनुभवलेलं - पाहिलेलं - ऐकलेलं!