अपत्यः मुलगा की मुलगी - एक वादंग!

चालु पिढीमध्ये "एकच मुल" ही कल्पना ( नक्की कल्पना की योजना? ) बर्‍यापैकी जम धरतेय. विषय तसा वैयक्तिक आणि सेन्सिटीव्ह आहे. मी ही त्याच त्याच विचाराचा. त्यात बायकोही त्याच मताची मिळाली. मग काय - आम्ही दोघं - आमचं एकच! मात्र आजकाल बर्‍याचदा मित्रमंडळी - पाहुणे - यांच्याकडुन "अरे, वेदिका पाच वर्षाची झाली ना? मग अजुन काय विशेष?" अशी विचारणी चालु असते. आता ते "विशेष" म्हणजे "दुसरा चान्स कधी घेताय?" याचा शॉर्ट कट!

अपत्यः मुलगा की मुलगी [फोटो - अनिकेत समुद्र]
अपत्यः मुलगा की मुलगी [फोटो - अनिकेत समुद्र]

तर - दुसर्‍या अपत्याबद्दल बोलुत. मी जेंव्हा "एकच" या विषयांवर ठाम राहिलो तेंव्हा खालील प्रश्नांची देवाण - घेवाण झाली. आता हे प्रश्न कुणी आणि का विचारले हे न विचारलेलं आणि सांगितलेलं बरं!

ते - वंशाला दिवा हवा!
मी - म्हणजे दुसरं अपत्य मुलगाच हवा - असंच ना?
"तुम्हाला मुलगाच होईल - हे खा - ते प्या - असं करा - तसं करा" या थोतांडावर माझा विश्वास नाही. जर आम्हाला मुलगा व्हायचा होता - तर तो पहिल्यांदाच झाला असता! आता वंशाच्या दिव्याच्या नावाखाली चक्क "मुलगाच पाहिजे" असं सांगताहात. शिवाय मुलगा की मुलगी हे चेक करण्याचीही आपली तयारीच असेल. [ - हो, काही ठिकाणी आजही अशा चाचण्या होतात - शोधल्यावर देवही सापडतो - डॉक्टर का नाही? ] आणि मग जर या चाचणींत "मुलगी आहे" असं कळालं तर अ‍ॅबॉर्शन करा असंही म्हणायचा तुम्ही मागं - पुढं पाहणार नाही!

ते - नाही.. असं नाही - दुसरीही मुलगीच झाली तर हरकत नाही!
मी - असं कसं नाही. उद्या तुम्ही तिला - मुलाच्या जागी जन्मली - असा टोमणा कशावरुन नाही मारणार? शिवाय दोन मुलं सांभाळण्याची आमची तयारी आणि परिस्थितीही नाही! दोघांना चांगल्या परीनं वाढवणं - चांगलं शिक्षण हे मला शक्य नाही.

ते - ज्यांन चोच दिलीय तोच दानापण देईल! गरीबाची मुलंही खेड्यात राहुनही डॉक्टर - इंजिनिअर होतातच ना? तु झालासच ना?
मी - झालं - पुन्हा देवावर भार टाकुन मोकळं! माझी व बायकोचीही यासाठी मनाचीच तयारी नाही. जिथं कुटुंब फक्त माझ्या एकट्याच्या कमाईवर चालतं तिथं - दुसरं अपत्य करुन दोघांनाही उगाच मारुनमटकुन जगवायचं नाही. त्यापेक्षा एकालाच आम्ही चांगलं वाढवु - शिकवु! गरीबाची मुलं - गावी खेड्यात राहुन - तालुक्याच्या ठीकाणी शिकुन डॉक्टर - इंजिनीअर होतात, पण त्या खेड्याचं नाव "पुणे" किंवा "मुंबई" असं नसतं ना!
मी शिकलो ना - पण त्यासाठी - नातेवाईकाकडे शिकायला रहावं लागलं. लहाणपणीच आई-वडिलांपासुन दुर राहणं मी अनुभवलंय. माझ्या अपत्यांनं तेच पुन्हा अनुभवावं असं मला मुळीच वाटत नाही. शिवाय हेच वाक्य त्यांन मला पुन्हा ऐकवावं हे तर मुळीच वाटणार नाही.

ते - राखी-पौर्णिमा/ भाऊबीज यासारख्या प्रसंगी मुलीनं भाऊ म्हणुन कुणाकडं पहावं?
मी - [ हा जरा सेंटी प्रश्न! ] आता एकच मुलगी असणारा मी काय जगातला एकमेव बाप आहे का? काहींनी तर मुलगा - वंशाचा दिवा पेटवता पेटवता - मुलींची अगदी रांगच लावलेली असते ना!
ठीक आहे - मी एक मुलगा दत्तक घेतो. त्यालाच राखी बांधेल.

आता मात्र "दत्तक" विधानासाठी "त्यांची" अजिबात तयारी नसते. त्यामुळं हा प्रश्न इथंच कट् करण्या येतो.

ते - म्हातारपणी मुलगाच सांभाळेल ना? मुलगी लग्न करुन निघुन जाईल!
मी - हो - मुलगी लग्न करुन जाईलच. मात्र मुलगा सांभाळेच कशावरुन? मुलानंच वार्‍यावर सोड्लेले आणि मुलीनं आधार दिलेले आई-वडिलही मी पाहिलेत. आणि महत्त्वाचं म्हणजे - म्हातारपणी आमची कुणी सेवा करणारं [करणारा!] असावं यासाठी मुलगा जन्माला घालणं हे नात्यांपेक्षा - एक बिझनेस डील वाटतं- नाही का? म्हातारपणाची मी तयारी करीनच. मुलीला वाटलं तर ती देईल लक्ष - नाही तर नाही! मात्र तीनं ते करायलाच पाहिजे अशी आमची तरी अपेक्षा नाही.

.... विषय बंद!

अपत्यं कधी आणि किती असावीत हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र होणार्‍या अपत्याच्या आयुष्याचाही विचार करा ना! करीयर - सेटलमेंट च्या नावाखाली पस्तीसी पर्यंत टोलवा-टोलव करताना आपण खाली दिलेले मुद्दे लक्षात घेताहात का:
अ. आपलं अपत्य जेंव्हा ग्रॅज्युएट होईल तेंव्हा त्याच्या पदवी वितरणात तुम्ही त्यांचे आजोबा - आजी तर वाटणार नाही ना? कारण आता तुम्ही ३०-३५ असाल तर २० वर्षांनी तुम्ही ५०-५५ चे असाल!
ब. आपलं अपत्य शिकुन कमवते व्हायला अंदाजे २५-३० वर्षे धरली तर तुम्ही त्याच्या लग्नात हजर असाल का?

अपत्यं किती असावीत हाही तसाच गहण प्रश्न. माझ्या परिस्थितीच्या [ आर्थिक - सामाजिक सर्व बाबतीत ] मानानं मला एकच अपत्य हवं होतं - आहे. पाहिजे तर माझी लायकी तेवढीच आहे असं समजा. आजचा काळ - आणि १५-२० वर्षांनी येणारा आपल्या मुलांचा काळ यांचा विचार करुनच प्रत्येकानं निर्णय घ्यावा. " उगाच एक ना धड - भाराबर चिंध्या " करुण्यात काय अर्थ आहे. उद्याच्या परिथितीला - अपत्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची ठेवुनच निर्णय घ्या!

प्रश्न बरेच असतात - आहेत - त्यांना उत्तरेही असावीत. मात्र काही प्रश्न अनुत्तरीतच चांगले वाटतात!