डु नॉट डिस्टर्ब!

डी.एन. डी. अर्थात डु नॉट डिस्टर्ब - म्हणजे - त्रास देऊ नका! पण हे त्या टेलीमार्केटींगवाल्यांना कोण सांगणार? दोन आठवडे झाले, सारखे फोन करताहेत. टाईमपास म्हणुन कीती फोन घेणार? आणि हो, यांचे फोन कधी ही येतात! म्हणजे तुम्ही ऑफिसला पोहचायच्या आधी यांचं ऑफिस सुरु झालेलं असतं.. तुम्ही ड्रायविंग करत असता आणि फोन वाजतो. गाडी कडेला घेऊन तो महत्वाचा फोन अटेंड केल्यावर समजते की तो टेली मार्केटींग कॉल आहे! बॉसबरोबर बोलतोय - आणि यांचे कॉल सुरु... अहो, फोन कट केला, तरी काही वेळातच पुन्हा कॉल येतोच!

कदाचित ह्या सार्‍या टेलीमार्केटींगवाल्यांना माझ्या बद्द्ल कुणीतरी चुकिची माहिती दिली आहे ज्यामुळे ते मला अति-श्रीमंत कॅटेगरीतील समजु लागलेत किंवा इंटरनेटवर कुणीतरी - कुठेतरी माझे बँक खाते - बॅलन्स वगैरे अगदी वाढवुन - चढवुन - पब्लिक डिस्प्ले साठी ठेवलंय! नाहीतर अचानक एवढे सारे लोक मलाच का फोन करतील? ;)

तर, सुरुवात झाली ती एस.बी.आय. च्या क्रेडीट कार्ड वाली कडुन:

ती: हॅलो... क्या मै. मि. *** से बात कर सकती हुं?
मी: जी, आप मि. *** से ही बात कर रही हो..
ती: थॅक्यु सर. मै एस.बी.आय. बँक के बि - हाफ से बोल रही हुं..हमारी बँक ने नया क्रेडीट कार्ड लॉंच किया है.... इसमें आपको ५% कॅश बॅक मिलेगा... और अ‍ॅड-ऑन कर्ड भी मिलेगा... आप अपने दुसरे कार्ड का बॅलन्स ट्रान्सफर कर सकते हो...और आपको कोई खास डॉक्युमेंट्स भी नही देने पडेंगे.......... हुश्श्श...!
मी: आपल्याला मराठी येतं?
ती: हो.. येतं ना!
मी: अच्छा. मग आपण, मराठीतच बोलु. त्याचं काय आहे मॅडम, माझ्याकडे आधीच ए.बी.एन आणि स्टॅ.चॅ. ची कार्डे आहेत. त्यामुळे मला आता नविन नकोय्! सॉरी.
ती: पण सर या कार्डवर आपणांस पेट्रोल सरचार्ज लागणार नाही?
मी: हो, पण माझ्याकडच्या कार्डवरही लागत नाही. अगदीच खास काय आहे, तुमच्या या कार्डामध्ये?
ती: ५% कॅश बॅक!
मी: अच्छा! वर्षाचे कीती पैसे भरायचे?
ती: जर आपण २५ किंवा ५०००० वर खरेदी केली तर काही नाही. नाहीतर ५०० किंवा १००० रु. तुम्ही निवडलेल्या कार्ड नुसार!
मी: हुम्म! पण बाकीच्या बँक तर काहीच चार्ज घेत नाहीत, वर्षाचे.
ती: म्हणुन तर ते कॅशबॅक देत नाहीत ना सर. आणि महत्वाचं म्हणजे - आता फक्त एस.बी.आय. आणि स्टॅ.चॅ. च कार्ड देतात. बाकी सार्‍या बॅंकांनी बंद केलय!
मी: अच्छा! तरीही.... मला कार्ड नकोय. माफ करा.
ती: ठीक आहे, सर!

तसा हा टेली - कॉल बर्‍याच दिवसांतुन वर्षातुन - आला होता. त्यामुळे थोडं बोलणंही झालं. त्यामुळं त्या दिवशी तसं नविन काही वाटलं नाही. मात्र दुसर्‍या दिवसांपासुन अगदी रांगच लागली.

तो: स्टॅ.चॅ. = नविन कार्ड आलयं... कॅशबॅक... हे आहे... ते आहे..
ती: रेलिगेअर मधुन बोलतेय - आपल्या रिटायरमेंट प्लान बद्द्ल थोडं बोलायचं होतं. कधी पाठवु आमच्या एक्झिक्युटिवला?
ती: सर, अविवा मधुन बोलतेय, नविन इंश्युरंस स्कीम आहे. आपली दहा मिनिटे हवी आहेत. मी आपणास लगेच एक्सप्लेन करते.

हुश्श्श्श्श्श्श्श....!

आता या कॉल्स बरोबर एस.एम.एस. ही चालुच होते.

**** हॉटेलमध्ये या, २०% डिस्काऊंट चालु आहे!
**** या कोर्सचे ट्रेनिंग सुरु होत आहे. लवकरात लवरकर नाव नोंदणी करा!
**** कॉल करा... फ्ल्युंएट इंग्लिश बोलायला शिका..

आता मात्र डोकं सटकलं. तडक आयडियाला मेल लिहिली आणि वरचे सारे नंबर दिले. हे पण नमुद केले की, माझा नंबर डिसें. २००७ पासुन डी.एन.डी. साठी रजिस्टर्डआहे. मात्र गेल्या सात दिवसांतील ह्या फोन आणि मेसेजेसमुळे मी अगदी भांडावुन गेलो आहे. ताबडतोब सोक्षमोक्ष लावा...!

हुम्म... मेल गेल्या गुरुवारी लिहिली. शुक्रवारी टेली - कॉल किंवा मेसेज नाही आला. बरं वाटलं!

मात्र आता नविनच मेसेजेस सुरु झालेत!

आपले नेते **** यांची पदयात्रा
दि. ** रोजी ** येथे आहे.
वाजत गाजत या!

आपले नेते **** हे दि. ** रोजी ** मधुन
आपली उमेदवारी दाखल करणार आहेत.
हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा!

आवडते नेते **** यांच्या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा!

खरंय, लोकनेते, म्हणजे लोक आणि नेते, दोन्हीही टेक्नो आणि त्याचबरोबर इस्टमनकलरही झालेत. आजकाल एस.एम.एस. वर असं निवडणुकांच मार्केटींग कँपेन जोरात चालु आहे. काही वर्षापुर्वी, माझ्या एका मित्राच्या मोबाईलवर फोन आला. त्यांनं हॅलो म्हटल्याबरोबर तिकडुन आवाज आला - "नमस्कार, मै अटलबिहारी वाजपेयी बोल रहा हुं! " [ अ.मा = लोकसत्ता - २५ फेब. २००४]

.... या विषयावर लिहायचं नाही, असं ठरवलं होतं, मात्र आत्ताच पुन्हा एस.बी.आय. चा क्रेडीट कार्डचा फोन झाला... आणि .... टींग - टींग...थांबा, नविन मेसेज आलाय....... ....... ...... .....!