शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २००९

मतदार बंधु - भगिनींनो....येत्या १३ ऑक्टोंबरला तुम्ही आपल्या मतदानाचा हक्क बजावायला जाल. अर्थातच जाल! कारण त्या दिवशी करण्यासारखं खास काही नसेल. म्हणजे एक तर ऑफिसला सुट्टी असेल आणि बहुतेक दुकाने, मॉल्स, सिनेमाघरे बंद असतील. मग घरी बसुन काय करणार? तर, मतदान करा. मात्र ते करण्याआधी तुम्ही या गोष्टी ध्यानात घ्या:

१. आपल्या वार्डा मतदार संघातील उमेदवाराचे आपणास कीती मेसेज - फोन आले यांची खात्री करा. कारण त्यावरुनच त्यांच्या "कार्यशिलतेची" कल्पना येऊ शकते.
२. आपल्या घरापासुन किंवा वार्डा मतदार संघापासुन लागणार्‍या प्रत्येक चौकात यांचे कीती आणि कीती फुटी मोठे होर्डींग्ज लागलेत यांची गिनती करा. त्यावरुन त्यांनी केलेल्या खर्चाची जाणीव होईल!
३. उमेदवाराने आपली मालमत्ता कोटीमध्ये जाहिर केली असेल तरच त्याचा उमेदवारीसाठी विचार करा. किरकोळ मालवत्तावाला तुमची - आमची काय मदत करणार हो?
४. उमेदवाराचे क्रिमिनल रेकॉर्ड असणे महत्त्वाचे. अगदीच सभ्य उमेदवार तुमच्यासाठी काहीही करु शकणार नाही! कठीण समयी असलेच उमेदवार कामी येतात.
५. शक्य तितक्या लवकर आपल्या मताचा - एका आणि फॅमिली पॅकचा - दर ठरवा. उगाच नंतर घासाघासी नको. बारगेनिंग आणि सेलचा जमाना आहे म्हटलं!
६. कॅश किंवा गिप्ट आधीच ठरवा. हवं तर टी.व्ही., फ्रिज, डी.व्ही.डी. प्लेअर किंवा कंबो - ऑफरचा विचार आधीच करा.आणि मतदानाच्या आधी हे घरपोच होईल याची खात्री करा!
७. तुम्ही जर एखादा जिम, क्लब किंवा इतर काही संस्था चालवत असाल तर त्यासाठीचे साहित्य आधीच तुमच्या संस्थेत पोहचेल याची खात्री करा. हार-जित तो चलती रहेगी.. उगाच आपल्या पायावर कशाला कुर्‍हाड मारा?
८. एखादी पोलिस केस वगैरे चालु असेल तर ती त्यांच्या मार्फत आधीच "निल" करुन घ्या. नाहीतर मतदाना नंतर पुढची पाच वर्षे तुम्हालाच ते निस्तरावे लागेल.
९. आपल्या मुलाचे - मुलीचे शाळा - कॉलेजचे प्रवेशाचे काम अजुनही रेंगाळले असेल तर हीच वेळ आहे. त्यांच्या नावाने ताबडतोब प्रवेश करवुन घ्या!
१०. उमेदवाराची काही कार्यसुत्री असली - नसली तरी, तुमच्या आडलेल्या कामाचा उल्लेख करुन घ्या. उदा. नळाला पाणी न येणे... रस्ता खराब असणे... विजेची अडचण वगैरे - वगैरे!

हां, आता स्वत:च्या मनात, आपण ही "दशसुत्री योजना" राबविण्याचा पुर्णपणे नक्की करा. ऑनेस्टी, मताचा अधिकार, प्रामाणिकता, सामाजिक बांधिकलकी आणि जबाबदारी वगैरे सारख्या गोष्टी स्वतःवर हामी - वरचढ - होऊ देऊ नका. तुम्ही - आम्हीच या गोष्टींचा विचार करायचा काय ठेका घेतलाय? शिवाय तुमच्या - आमच्यावर केला जाणारा खर्च हा ते एका वर्षाच्या आतच भरुन काढतील, अगदी व्याजासहित! तेंव्हा तुम्ही कोणताही सुविचार न करता मतदान करा!

ता.क. माझे वोटर कार्ड आले नाही, साहजिकच मला यावेळी मतदान करता येणार नाही. मात्र तुमच्यासारख्या एकाला तरी मी योग्य उमेदवार निवडण्यास जागरुक करु शकलो, याचं समाधानही माझ्यासाठी खुप आहे, नाही का?

बदलः वार्ड = मतदार संघ  [अनामिताच्या सुचनेवरुन!]
स्वत:चं डोकं वापरा, आता तरी जागे व्हा! यावेळी विचारपुर्वक मतदान करा!

6 टिपणी/ टिपण्या:

अनामित म्हणाले...

वार्डातील kay mhanta? Ma. Na Pa chi nivadnuk nahi ahe hi..Nagarsevak nahi bhavi amdar ubhe ahet. matadar sangha mhana.

Ajay Sonawane म्हणाले...

mala tar majhya bhagat eka hi layak umedvar vaatat naahi, pan tyatlya tyat thik mhanoon ShivSenela mat dein mi, saglech nalayak aahet politics madhye

कांचन कराई म्हणाले...

संधी द्यावी म्हणतेय. इतक्या लोकांना संधी दिलीच होती, परिणाम समोर आहेत. तर आता आणखी एक नवा भिडू....

Mahendra Kulkarni म्हणाले...

स्वत:चं डोकं वापरा, आता तरी जागे व्हा! यावेळी विचारपुर्वक मतदान करा!...
हे वाक्य खुप आवडलं.. सगळ्या लेखाचा सारांश एकाच वाक्यात आला तुमच्या....

भुंगा म्हणाले...

@अनामित,
हां, सुचना योग्य - बदल केला. धन्यवाद. स्वतःच्या नावे लिहिलं असतं तर बरं झालं असतं :)

@अजय,
लायक आहे किंवा नाही हे उमेदवाराच्या कामावरुन ठरु द्या... पक्षावरुन नाही, म्हणजे मला कोणत्या ठराविक पक्षावर - उमेदवारावर टिका वा नोंद करायची नाही. म्हणुनच म्हणतोय, यावेळी "दिल से" नव्हे तर "दिमाग से" काम घ्या!

@कांचन,
नविन - तरुण - कार्यशिल उमेदवारांना संधी देणं योग्य ठरेल. मात्र त्यांच्यावरती विश्वास ठेवायलाही तयार हवं!

@ महेंद्रजी,
ही "दशसुत्री" मी माझ्या बघण्यातल्या - वाचणातल्या अनुभवावरुन लिहिलिय. नेहमीच स्वार्थाने मत देण्याऐवजी यावेळी जरा विचार करुन, शहराच्या, राज्याच्या आणि अनुषंगाने देशाचा विकास आणि हित करणार्‍या उमेदवारास मत मिळावे, हाच उद्देश!

प्रतिक्रियेबद्दल सर्वांचे आभार!

sachin म्हणाले...

मस्तच .... आणि सगळ्यात महत्वाचे सगळ्यांनी voting करणे हे आहे.मान्य आहे कि बरेच उमेदवार तसे लायक नाहीत . तरी देखील "दगडा पेक्ष्या वीट मऊ" या न्यायाने मतदान करणे सगळ्यात महत्वाचे .त्यामुळे जन हो घराबाहेर पडा आणि मतदान करा