माझी भटकंती : चावंड किल्ला

.... गेल्या महिन्यातील तोरण्याच्या पावसाळी भेटीनंतर मध्यंतरी ऑफिसची मुळशी पिकनिक झाली.. आता या महिन्याच्या भटकंतीसाठी आम्ही भटके एका नवीन गडाच्या भेटीची तयारी करु लागलो... थोड्याशा शोधा-शोधीने "चावंड" ला जायचे नक्की झाले.

शनिवार - दि. १ सप्टेंबर, २००७.... टीम बनली चांगली ९ लोकांची.. मी, कुणाल, अर्नब [बाबू-मोशाय], राहुल, सुरिंदरसिंग, कुणाल [नं.२], दिपक [नं.२], विशाल आणि अंजन... सुरिंदरसिंग आणि कुणाल नं.२ हे गडी माझ्या या आधीच्या ऑफिसमधले. या आधी मी आणि सुरिंदरसिंग, दोघांनी - राजगड, सरसगड ट्रेक आणि ठोसेघर सारख्या भटकंती एकत्र केल्या आहेत...

माझ्यासारख्या भटक्याच्या पायात भवरा असतो असं म्हणतात... अर्थात, प्रत्येकाचे भटकायचे कारण वेग-वेगळे असू शकते आणि असतेही... जसं, मी भटकतो आपल्या इतिहासाच्या शोधात.. किल्ले... मंदिरे.. जुन्या वास्तु.. निसर्ग.. आणि माझ्याबरोबर कुणाल भटकतो तो त्या-त्या ठिकाणी आपले फोटो काढण्यासाठी... काहीही असो... मला सोबत मिळते आणखी एका भटक्याची आणि तो खुश असतो मी काढलेल्या फोटोवर..!


शनिवारी सकाळी, अंदाजे ८.०० वा. आम्ही सगळे चावंडच्या दिशेने निघालो... यावेळी जास्त लोक असल्याने टाटा - सुमो भाडयाने मिळवली. तशी हीच गाडी पावसाळी भटकंतीसाठी योग्य आहे. पिंपरी-चिंचवड - राजगुरुनगर - जुन्नर - चावंड असा हा रस्ता. ब-याच अंशी रस्ता चांगला आहे, त्यामुळे, पावसाळा असुनही गाडी आरामात चालली... दिड-दोन तासांच्या प्रवासानंतर आम्ही जुन्नरला पोहोचलो.... मस्त पालक-भजी, कांदा-भजी आणि गरमा-गरम चहा घेतला...! सगळेजण एकदम फ्रेश झाले..!

जुन्नर मधुन चावंडकडे जाताना, रस्त्यावरुनच शिवबाच्या जन्मस्थानाचे - शिवनेरीचे दर्शन होते.... तसा शिवनेरी मी या आधी एकदा पहिलाय. पण यावेळी हिरवागार दिसणारा त्याचा तो अवतार पाहुन पुन्हा एकदा जाण्याची खुम्-खुमी मनात जोर पकडत होती.... मनाची समजुत घातली.... दुरवर लांब डोंगरात - धुक्यात लपलेल्या लेण्याद्रिच्या गणुलाही मनोमन नमस्कार घालुन आम्ही पुढे निघालो...

चावंड गाव तसे छोटेसे... सभोवतालच्या डोंगरांनी सजवलेल्या कुशीत वसलेली, महादेव कोळी समाजाची ती सुंदरशी घरे... रस्त्याच्या कडेला असणारी ती आश्रम शाळा....वा!.... मस्त नजारा होता....!

गडावर जाण्याचा रस्ता त्या आश्रम शाळेच्या मागुन जातो. हिरव्यागार झाडीत लपलेला, काळ्याशार पाषाणाचा तो चावंड जणु त्या शाळेवर नजर ठेवणा-या "हेडमास्तर"सारखा दिसत होता...


शनिवार असल्याने विद्यार्थी लवकरच घराकडे निघालेले दिसत होते. मात्र काहिजण जेवणाची तयारी करताना दिसले. शाळेचा काहितरी कार्यक्रम असावा.. किंवा... शाळेकडुन जेवण मिळत असावे... असो.. एकंदरीत जेवण बनविण्याची तयारी जोमात होती..... एक-दोन मुलांना रस्ता विचारुन आम्ही शाळेच्या पाठीमागे जीप उभा केली. ड्राइव्हर वरती येण्यास तयार नव्हता... आम्ही जाऊन येइपर्यंत मस्त झोप काढतो म्हटला.... जरूरी सामान पाठीवर लादुन आम्ही गड चढायला सुरुवात केली...


चामुंडा अपभ्रंशे चावंड | जयावरी सप्तकुंड ||
गिरी ते खोदुनि अश्मखंड | प्रसन्नगडा मार्ग निर्मिला ||

चावंड गडाला अनेक नावे आहेत, जसे: चामुंड, चाउंड, चावंड हे चामुंडा [देवीच्या] नावाचा अपभ्रंश. गडावर पाण्याची सात टाकी आहेत. चुंड हे निजामशाही आमदानीतील नाव... पुढे शिवरायांनी याचे नाव - प्रसन्नगड असे ठेवले.गडाचा सुरवातीचा काही भाग घसरडा आहे... पावसामुळे म्हणा... शिवाय गुडघ्याएवढे वाढलेले गवत वाट शोधायला त्रासदायक ठरत होते. अंदाजे मध्यभागापर्यंत चढण ठीक ठाक होती.. आता पुढे मात्र भिंतीमध्ये कोरलेल्या त्या लहान पाय-यांवरुन वरती चढायचे होते. कोण्या एका निसर्गवेड्या वनरक्षकाने किंवा गडांची जाण राखणा-या मावळ्याने या ठिकाणी साईडबार लाऊन तुम्हां-आम्हांला गड चढण्यास सोय करुन ठेवली आहे. मात्र हा साईडबार पहिला टप्प्यासाठी - अंदाजे १० पाय-यांसाठी आजही मजबुत आहे. पुढचा टप्पा अगदीच उभा आहे आणि त्या जागचा साईडबार अगदी हवेत तरंगत असल्यासारखा आहे.


"१ मे १८१८ च्या इंग्रजांच्या हल्ल्याची साक्ष देत असणा-या... या पाय-या अगदीच छोट्या असल्याने जरा धिराने व सावधतेने चढणे आवश्यक आहे. मात्र प्रवेशदाराजवळच्या पाय-या अंदाजे २.५ ते ३ मीटर लांबीच्या, ब-याच अंशी प्रशस्त आहेत..."मध्येच अडकल्याने मी दिपक नं.२ ला मदतीसाठी वरती बोलावले. त्याने वरती चढुन त्या पाय-यामध्ये घट्ट बसवलेल्या त्या निकामी तोफेला दोर बांधला. ही तोफ फार छोटीशी दिसत असली तरी मजबुतीने पाषाणात रोवलेली आहे. दिपकने दिलेला दोर पकडुन मी वरती आलो. मग सर्वांना दोराच्या सहाय्याने वर घेतले. आजुबाजुला चरणा-या शेळ्या आणि गाई आमच्याकडेच बघुन जणु हसत होत्या. अगदी टोकावर उभा राहुन कोवळे - लुसलुशीत- गवत खाणा-या त्या शेळ्या मात्र मला एकदम एक्सपर्ट ट्रेकर्स वाटल्या.. !! रस्त्यात उंच वाढलेले गवत बाजुला सारत आम्ही वर चढत होतो... चढाई तशी सोपीच आहे.. मात्र पावसामुळे वाट घसरडी/ निसरडी बनली आहे. थोडीशी खबरदारी घेत आम्ही मुख्य दरवाजापर्यंत पोहोचलो.


"... गडावर चढण्यासाठी मदत करणारी ही तोफ आपल्या इतिहासाचा एक भाग आहे. कुण्या एका अनामिकाने अजानतेपणी म्हणा या ठिकाणी रोवली आहे. मात्र या ठीकाणी एखादा लोखंडी खांब किंवा बार लावला असता तर ही आठवण जोपासता आली असती. दोन ते अडीच इंचाचा व्यास असणारी ही तोफ दोन ते अडीच फुट लांबीची आहे."डाव्या हाताला असणारा गडाचा मुख्य दरवाजा आजही भक्कम स्थितीत आहे. समोरच्या काळ्या-पाषाणी भिंतीवर गणेशाची सुंदर मुर्ती कोरलेली आहे. ब-याच अंशी समान मुर्ती या दरवाजावर कोरलेली आहे. दरवाजातुन वर गेल्यानंतर डाव्या हाताला जाणारा रस्ता गडाच्या तटबंदीकडे घेऊन जातो. डाव्या बाजुची तटबंदी आजही तग धरुन आहे. उजव्या हाताला, कातळात कोरलेल्या काही पाय-या, अंदाजे १५-२०, चढुन गेल्यावर एक चौथरा लागतो. वाढलेल्या गवतात हा दिसतही नाही... बाजुलाच एक मोठाले उखळ पडले आहे.... त्याच्या बाजुला गवतात लपलेली दोन टाकी आहेत. या ठिकाणी गवतातुन चालताना जरा सावधानच रहा!

उत्तरेला एक मंदिरासारखी वास्तु उभी आहे. तिची कमान व त्यावरील नक्षीकाम सुंदर आहे. आसपासच्या २००-३०० मीटर अंतराच्या घे-यात जवळ-जवळ ७-८ टाकी आहेत.... बहुदा ती सप्त मात्रूकांशी संबंधित असावीत. बेलाग कड्यांनी व्यापलेला हा गड बराच विस्तिर्ण आहे. सभोवताली वाढलेले अनेक जातीचे गवत आणि झाडे... गडाच्या सभोवताली असणारी डोंगररांग गडाच्या सौंदर्यांत भर घालत होते.

गडाच्या मध्यभागी म्हणता येइल अशा ठीकाणी सर्वात उंच भागावर देवी चामुंडाबाईचे मंदिर आहे. मदिराचे बांधकाम अलीकडच्या काळातील असले तेरी मुर्ती फार प्राचीन दिसते. आजुबाजुला काही भग्न मुर्त्या पडलेल्या दिसल्या... वा-यामुळे देवीच्या मंदिरावर फडकणारा भगवा खाली पडला होता... कुणालने पुढाकार घेऊन मंदिरावर चढुन झेंडा लावला... पुन्हा जोमाने फडकणारा तो भगवा मनाला एक अंतरीचे सुख देऊन गेला... मंदिराच्या समोरच एक दिपमाळ आहे.... इतरत्र पडलेल्या मुर्त्यामध्ये असणार नंदी आणि समोरची दिपमाळ आसपास शिव-मंदिर असल्याची जाणीव करुन देत होते. मात्र प्रत्यक्षात तसे काही दिसत नव्हते. कदाचित काळाच्या ओघात हे वाहुन गेले असावे.

गडाचा विस्तार सुमारे ४-५ की.मी. चा असावा. शिवाय गडाच्या ईशान्येस काही गुहा असल्याची नोंद मला इंटरनेटवर सापडली होती.

अंदाजे ३.०० वा. आम्ही गड उतरायला सुरुवात केली. सुरवातीच्या मोठ्या-थोरल्या पाय-या उतरल्यानंतर कुणालेने रॅप्लिंग करुन उतरणाचे सुचवले... आणि त्याला विशाल, दिपक आणि अंजनने तयारी पण दाखवलली.... राहुल आणि अर्नब या दोघांना पाय-यांवरुन उतरणे अधिक सोपे वाटले. त्यामुळे त्यांना खाली उतरायल मदत करुन व समान खाली ठेउन मी पुन्हा त्या तोफपर्यंत वर गेलो... मला पण रॅप्लिंग करायचे होते तर.... :-०.. विशाल, सुरिंदर, कुणाल[२], मी व दिपक[२] आणि अंजन मस्त रॅप्लिंग करत खाली उतरलो..... अंदाजे ३०-३५ मी. चा हा दगडी पॅच रॅप्लिंगसाठी मस्त आहे. मात्र सोबत अनुभवी ट्रेकर्स आणि रॅप्लिंग केलेले लोक असावेत.... या पुर्वी घनगडला आम्ही रॅप्लिंग केले होते... त्या वेळी ५-६ मिनिटे लागली होती... मात्र या वेळी अगदीच २ मिनिटातच खाली उतरलो.

रॅप्लिंग करुन आम्ही पटापट खाली उतरण्याच्या तयारीला लागलो.... आल्या हाती ऐतिहासिक कुकडेश्वर मंदिर पहायला जायचे होते ना.... तसा प्लान नाणे घाटात जाण्याचा पण होता... मात्र रॅप्लिंगचा नादात आम्ही जरा लेटच झालो होतो.... ४.३० ला आम्ही आमच्या गाडीजवळ पोहोचलो.... शेजारच्या हात्-पंपावर तोंड-हातपाय धुवुन पटापट गाडीत बसलो.. व गाडी कुकडेश्वराच्या मंदिराच्या दिशेने धावु लागली....


".. मागच्या ट्रेकला हजर असणारी... वेलु, अनिता, अभय आणि चंदु ही मंडळी मात्र या वेळी आपापल्या कामामुळे येऊ नाही शकली... पण काही हरकत नाही.... पढचा ट्रेक लवकरच बनतोय..!"२०-२५ मिनिटातच आम्ही कुकडेश्वराच्या मंदिराजवळ आलो. मंदिराच्या जिर्णोध्दाराचे काम चालु असल्याने संपुर्ण मंदिर प्लॅस्टिकच्या आवरणात झाकलेले होते. कामासाठी लागणारे साहित्य व सिमेंट - वाळु मंदिराच्या आतच ठेवल्याने आत जाण्याचा मार्ग फारच छोटा आहे. गाभा-यात जाउन शिवाचे दर्शन घेतले. मंदिराच्या आवारात गणेश, शिवलिंग, यक्ष यांच्या सुंदर व रेखीव मुर्ती आहेत. मुख्य मुर्ती .. शिवलिंग... नागमुर्ती मात्र एका दुस-या ठीकाणी स्थापन केलेल्या आहेत.. समोरच अखंड धुनी तेवत आहे... मंदिराची देखभाल करणा-या त्या पुजारी काकांना चरणस्पर्श नमस्कार करुन आम्ही परतीच्या मार्गाला लागलो...

परतीच्या वाटेवर जसे आमच्या मोबाईलवर नेटवर्क दिसु लागले, तसा प्रत्येकजण आपापल्या फोनवर चिटकुन बसला... मी ही माझ्या बायकोला फोन करुन ट्रेक व्यवस्थित झाल्याची व परतीच्या मार्गावर असल्याची कल्पना दिली....

मी, दिपक, विशाल आणि अंजन पाठीमागे मस्त गप्प मारत बसलो.... रस्त्यात दापोडी जवळचा लागणारा इंदोरीचा भुईकोट किल्ला... चावंडच्याच अवती-भवती असणारे जीवधन, हडसर यांच्या सारखे संरक्षक किल्ले... त्या तिकडीचे ट्रेकिंगचे अनुभव... व पुढचा ट्रेक..!!

अंधुकशा उजेडात चावंड जणु पुन्हा भेटायला येण्याचा आमंत्रण देत होता..!!


..... हो हो.... विसरलो नाही... फोटो साठी ज़रा धीर धरा .लवकरच अपलोड करतोय! हे घ्या फोटो !

...भुंगा!

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
Good Going with the Bhatkanti !