भटकंती: रायरेश्वर


कान्होजी जाधव, बाजी पालसकर, तानाजी मालुसरे, सुर्याजी मालुसरे, येसाजी कंक, बापुजी मुदगल, न-हेकर देशपांडे, दादाजी नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर या मंडळींच्या उपस्थितीत शिवबा आपल्या सवंगड्यासोबत रायरेश्वर या गिरिस्थानावर आले. शिवा जंगम यांनी पुजा केली आणि शिवबाने स्वराज्याची शपथ घेतली!

हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा असे शब्द ओठाबाहेर पडले... मंडळी शब्दाला जागली आणि हिंदवी राज्य साकारले!

हडसरचा बेत बनता-बनता रद्द झाला... जवळच्या गडांपैकी आता रोहिडा आणि रायरेश्वर यापैकी एक असा बेत ठरला... इंटरनेटवरुन थोडी माहिती गोळा केली आणि रायरेश्वर नक्की झाला... मग नेहमीप्रमाणे ट्रेकला येणा-यांची आणि... गाडीची जुळवाजुळव झाली... मंगळवारी येणा-या गांधी जयंतीची सुट्टी आणि सोमवारची एक दिवसाची रजा टाकली तर मला मस्त ४ दिवसांची सुट्टी मिळणार होती... तसेच केले...शनिवार - ३१ सप्टेंबर चा बेत - चला रायरेश्वर!

शनिवारी सकाळी ७ वा. मी, सुरिंदर, वेलु , चंदु आणि दिव्या... पाच लोक रायरेश्वरच्या ट्रेकसाठी निघालो.... रस्ता तसा सोपा आहे.. म्हणजे, पुणे - कात्रज सातारा हायवे वरुन शिंदेवाडी - भोर गाठायचे.. तिथुन कोर्ले आणि शेवटचा थांबा.. जांभुळवाडी ! मात्र शिंदेवाडीचा उजव्या हाताला लागणारा फाटा आम्ही चुकलो आणि काही अंतर पुढे गेलो... रस्त्याच्या बाजुला असणा-या "श्री राम" वडापाव मध्ये मस्त कांदा भजी, वडा-पाव आणि चहा घेऊन आम्ही शिंदेवाडीसाठी परत वळलो.

रायरेश्वराचा रस्ता विचारत विचारत आम्ही जांभुळवाडीत पोहोचलो... गाडी झाडाच्या सावलीला लावुन आम्ही चढाईची तयारी सुरु केली... डाव्या हाताला असणारा "केंजळगड उर्फ मोहनगड" हाच प्रथमदर्शनी रायरेश्वर वाटला.. पण जवळच गाई चरवणा-यांनी सांगितले की हा केंजळगड आहे आणि रायरेश्वर उजव्या हाताला आहे... तसे चार चाकी जीप असेल तर गाडी अगदि रायरेश्वराच्या पायथ्याची जाऊ शकते. मात्र कुशल चालक हवा!!

हिरव्यागार डोंगरावर पिवळ्या धमक फुलांची चादर ओढलेला रायरेश्वर काही औरच दिसत होता..!

पटापट फोटो घेत आम्ही पुढे चालत होतो... रायरेश्वराचा रस्ता - गायदरा मार्गे - फारच लांबचा आणि थकवणारा आहे. शिवाय रस्ता चुकल्याने आम्हाला बराच उशिरपण झाला होता.... ट्रेकला सुरुवात केली तेंव्हा ११.३० झाले होते... ऊनाचा त्रास जाणवायला लागला होता... आणि अशा परिस्थितीत एक रस्ता दिसला... धबधब्याच्या बाजुने वरती जाणारा... आणि इथेच आमचे गणित चुकले... खालुन सोपा दिसणारा हा मार्ग पुढे फारच अवघड होता... शिवाय आमच्याबरोबर ट्रेकिंचे काही खास सामानही नव्ह्ते.. अहो, अगदी दोरीसुद्धा नव्हती..!

कोणत्याही ट्रेकला जाताना - अगदी सोप्यातला सोपा सुद्धा - एक दहा फुटाची रस्सी/ दोर आणि छोटेसे "खुरप्यासारखे" हत्यार नेहमी बरोबर ठेवा...!

हातात असणा-या लाकडी काठीने पाय-या बनवत मी बाकिच्या लोकांना वरती चढण्यासाठी मदत करत होतो... घरड्या वाटेतुन रस्ता काढणे आणि तेही एका लाकडाने पाय-या बनवत.. बापरे..! काय करणार, खाली उतरण्यापेक्षा वरती चढणे एकवेळ सोईस्कर वाटत होते. दोन तास त्या रस्त्याशी लढत आम्ही जरा मोठी झाडे असणा-या भागात पोहोचलो...जव़ळचे पाणी केंव्हाच संपले होते.... आत रस्त्यापेक्षा पाणी शोधणे अधिक गरजेचे वाटु लागले होते....

एव्हाना दिव्या देवाची प्रार्थना करु लागली होती... या मार्गावर नविनच असणारी ती... रस्त्यात दाखवलेल्या श्री बालाजीला पाणी आणि सुखरुप वरती पोहोचविण्यासाठी प्रार्थना करत होती... बदल्यात, परतीच्या वेळी आम्ही दर्शनाला येऊ असा शब्द देत आम्ही पाणी शोधु लागलो....

नशिब खरंच चांगले होते... एका ठीकाणी पाण्याची एक अगदी लहान धार वहात होती... हातात पाणी घेऊन पिणे शक्य नव्हते... जवळच्या झाडाचे एक मोठे पान घेऊन त्याच्या सहाय्याने पाणी बाटलीत भरले... थंड आणि गोड पाणी...!! पाण्याची किंमत अशा वेळी कळते... नाहीतर शहरात येऊन बघा.. कीतीतरी नळ असेच मोकळे वहात असतात.. आणि घरीही तुम्ही आम्ही किती पाणी वाचवतो??

पोटभरुन पाणी पिलो आणि सोबतही घेतले.... छोट्याशा त्या जंगलात वाट शोधणे फारच अवघड होऊन बसले होते...वरती जाण्याच्या प्रत्येक मार्गात कधी काटेरी झाडे तर कधी मोठा दगडी पॅच येत होते... शेवटी जंगलातुन जाणारीएक पायवाट पकडुन आम्ही चालत राहिलो... घसरड्या मार्गावरुन दोन-तीन तास चालुन [कसरत करुन] आम्ही रायरेश्वराच्या खालच्या पठारावर पोहोचलो... आणि सुटकेचा श्वास सोडला...!

या ठिकाणापर्यंत पोहोचण्यास आम्हाला दुपारचे ३ वाजले होते.. म्हणजे १२ - ३ आम्ही त्या अवघड रस्त्यात धडपडत होतो. पाच-दहा मिनिटे आराम करुन आम्ही आता पुढे - रायरेश्वराचा मुख्य डोंगर चढायला सुरुवात केली... रस्ता अगदी स्पष्ट आणि पाय-याचा होता... मात्र पाय-यांचा रस्ता आता त्रासदायक जाणवु लागला होता... चालुन चालुन पाय फारच जड झाले होते..

त्या लाकडी काठीने पाय-या बनवुन माझ्या हाताला चांगलेच फोड आले होते... शर्ट आणि ट्रेक अगदी चिखलात लोळल्यासारखे झाले होते... हात आणि पायावरच्या किरकोळ जखमा सोडल्या तरी एकंदरीत आम्ही सगळे सुखरुप होतो..!

दगडी पॅचला लावलेली ती शिडी पार करुन आम्ही मुख्य पठारावर पोहोचलो.... वानरांच एक भलं मोठं टोळकं जणु आमच्या स्वागतासाठी तयारच होतं... त्यांना आभार सांगुन आम्ही मंदिराच्या दिशेने चालु लागलो..

चांगले एक कि.मी. चालल्यानंतर रायरेश्वराचे मंदिर आले. बाहेच्या हौदात हात-पाय धुवुन आम्ही दर्शनासाठी मंदिरात गेलो...मात्र आतल्या दरवाज्याला कुलुप असल्याने बाहेरुनच दर्शन घ्यावे लागले....शिवबांनी "स्वराज्याची शपथ" घेतलेल्या त्या रायरेश्वराच्या दर्शनाची तीव्र इच्छा मनात होती की काय म्हणा एक पुजारी पुजेसाठी तिथे आले..आणि त्यांच्या परवानगीने आत जाण्याची संधी मिळाली... सुखरुपपणे गडावर पोहोचविल्याबद्दल शिवबा आणि रायरेश्वराच्या पिंडीसमोर नतमस्तक होऊन आभार मानले.

स्वराज्य स्थापनेच्या शपथविधिचा फोटो आणि समोरच्या भिंतीवरची ती ढाल - तलवारीची जोड मनात शिवभक्ती जागी करुन गेली.. हरहर महादेव!!!

अंदाजे १०-१५ घरे असणा-या या पठारावर महाबळेश्वरपेक्षाही जास्त पाऊस पडतो. गडावर राहण्याची सोय आहे... गावकरी तुमच्या जेवणाचीही मस्त सोय करुन देतील... आम्हालाही आता भुक लागली होती... गडावर चहा, चपाती, दही आणि चटणी यांची लगेचच सोय झाली.. म्हणजे एका शेतकरी वजा रहिवाशी असणा-या माणसाने अगदी कमी दरात हे सगळे आणुन दिले...

सकाळी लवकर उठुन दिव्याने आमच्यासाठी "लो-कॅलरी" पराठे बनवुन आणले होते. सोबत आंब्याचे लोणचे.... उम्म...वा! शुद्ध दुधाचे [पाणी न मिसळता] ते दही फक्त लहानपणीच माझ्या मामाकडे खाल्याचे मला आठवते... त्यात ती तांबडी चटणी आणि चपाती... शप्पथ.. मला आता लिहिताना सुद्धा तोंडाला पाणी सुटलंय..!

५.३० ला आम्ही गड उतरायला सुरुवात केली... आता मात्र त्या लांबच्या रस्त्याशिवाय पर्याय नव्हता... अंदाजे ७ वाजता आम्ही गाडी लावलेल्या जागी पोहोचलो... महेश, आमचा ड्रायव्हर, बिचारा वाट बघत बसला होता...! पटापटगाडीतबसुन आम्ही परतीच्या मार्गाला लागलो... रस्त्यात एका ढाब्यावर थांबुन आम्ही चहा तर महेशने मस्त जेवण केले...

दिव्याने दिलेल्या शब्दानुसार आम्ही आता श्री बालाजी दर्शनासाठी निघालो... नऊ वाजता आम्ही श्री बालाजी मंदिराच्या बाहेर गाडी उभी केली... मंदिर ८.३० ला बंद होते... मंदिराबाहेच्या त्या गार्डला आम्ही देवाला दिलेल्या शब्दाचा एकंदरीत अंदाज दिला.. आणि एका दुस-या गार्ड सोबत त्याने पहिल्या गणपती मंदिरापर्यंत जाण्याची परवानगी दिली... आम्ही तेवढ्यावरही खुश... चालत जाउन गणोबाचे दर्शन घेतले ... श्री बालाजीलाही तिथुनच हात जोडले.... आणि गाडी पुण्याच्या मार्गी लागली.........!!

अरे हो... रविवारी पुन्हा श्री बालाजी दर्शनाचा योग आला... ऑफिसची काही मंडळी बनेश्वरला निघाली होती... रस्ता माहित असणारा मीच.. हा हा... चला बनेश्वर... आणि परतीच्या मार्गावर श्री बालाजी....! डोळेभरुन दर्शन झाले... दिलेला शब्द पाळला ... मनाचीही शांती...!

भरपुर फोटो या - इथे आहेत..!

...भुंगा!