वारी हरिश्चंद्रगडची ..


हरिश्चंद्रगड - माझ्यासारख्या भटक्यांची पंढरीच म्हटले तर वावगे ठरु नये .. योगेशचा नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड - हा लेख ब-याच वेळा वाचुन काढला होता आणि तेंव्हापासुन तर हरिश्चंद्रगडाची स्वप्नेच पडु लागली होती :-) कधी एकदा जाऊ असे झाले होते ... तर अशा या पंढरीची वारी करण्याचा योग शनिवार दि - १ डिसेंबर २००७ ला जुळुन आला .. मित्रांच्या ई-मेलचे देवाण-घेवाण आणि ग्रुप बनला - मस्त १३ लोकांचा !! मी, निखिल, कुणाल, चंदु, अर्नव, समर, विशाल, अंजन, संदिप [२], राहुल, सुमित आणि अमित.. शिवाजीनगर बस डेपोवरुन जुन्नरला जाणारी सकाळी ११.३० ची बस पकडुन आम्ही सारे गड जिंकायला निघालो ... तशी खिरेश्वरला मुक्कामी गाडी अंदाजे ४ वा. शिवाजीनगरवरुन आहे ... रात्री पोहोचणारी ही बस पकडुन खिरेश्वर गावात - शाळेत - मुक्काम करुन सकाळी-सकाळी गड चढाई करण्याची कल्पनाही चांगली आहे .. आम्ही मात्र जुन्नरवरुन - नारायणगाव - खाजगी जीप करुन ४.३० ला पायथ्याशी पोहोचलो ... आळस न करता चढाईला सुरुवात केली ..!

अंधार पडायच्या आधी तोलारखिंड पार करायची ठरवुन आम्ही चालत होतो .. रस्त्यात "एको-प्वाईंट" जवळ जरा फोटोगिरी करुन पुढे चालु लागलो ... पायथ्यापासुन तोलारखिंडीपर्यंत एकाच ठिकाणी पाणी लागते. एव्हाणा दिवस मावळायला लागला होता ... तोलारखिंडीचे ते वाघाचे मुर्तीवजा चित्र / व्याघ्रशिल्प पाहुन आम्ही बरोबर रस्त्यावर असल्याची जाणीव करुन घेतली .. तसे हरिश्चंद्रगड भटकायला आणि चुका-मुक व्हायला अगदीच सोपा आहे .. अररररर.. म्हणजे घनदाट जंगलात चुकण्याची शक्यता जास्त आहे ! व्याघ्रशिल्पाच्या डाव्याबाजुने चालत रहा असे बाण दाखवलेले आहेत ... जरा अंतरावरच तोलारखिंडीचा तो अवघड असा पॅच आहे ... कातळीत खोदलेल्या अरुंद पाय-या आणि तुटलेले रेलिंग ..! शिवाय आमच्याबरोबर "पहिल्यांदाच ट्रेकिंग करणारे" होतेच !! दुष्काळात तेरावा महिना म्हणतात ना तो असा .. !!

एक-मेकांना आधार देत आणि "मुश्कील वक्त - कमांडो सख्त" अशा आरोळ्या देत आम्ही हा पॅच "छॅ ... अगदीच सोपा!!" असे म्हणत पार केला आणि आंधारात पुढचा रस्ता शोधत चालु लागलो ..! छोट्याशा बॅटरींच्या उजेडातला हा ट्रेक अदभुत आणि अद्वीतिय असाच होता ! ... सुमारे दोन तास चालल्यानंतर एका पठारवजा भागात आम्ही रात्रीचा मुक्काम करण्याचे ठरवले.. कारण - हा ट्रेक करणारे आम्ही सारेच हरिश्चंद्रगड पहिल्यांदाच येत होतो ... त्यामुळे आतापर्यंत सुमारे पाच तास चालुनही समोर पुर्ण अंधार आणि घनदाट जंगल याशिवाय काहीही दिसत नव्हते ... शेवटचा पर्याय म्हणुन मी, विशाल, अंजन आणि संदिप यांनी थोडे पुढे जाऊन रस्त्याचा अंदाज घेऊन परतायचे असे ठरले आणि इतर मंडळींनी तोपर्यंत आराम करण्याचे ठरले ... आम्ही धाडस करत - बॅटरींच्या उजेडात रस्ता शोधला ... आपण अजुन पुढे जाऊ शकतो असा अंदाज आल्यावर आम्ही परत थांबलेल्या ठीकाणी आलो.. रस्त्यात भेटलेल्या एका ग्रुपने आम्ही बरोबर असल्याच्या मताला दुजोरा दिला व हरिश्चंद्रगड अजुनही एक - दोन तासाच्या अंतरावर असल्याचे सांगितले ..! घनदाट जंगलात रात्री थांबण्यापेक्षा चालत राहणे बरे म्हणुन आम्ही पुढे चालायला सुरुवात केली ...!

थंडीपासुन बचाव म्हणुन आणलेल्या चादरी - स्वेटर्स आता पाठीवर बसुन बोंब मारु लागले होते ... शिवाय जेवणाचे सामानही होतेच की बरोबर!! ... अंदाजे पाच छोटे-मोठे डोंगर पार केल्यानंतर शेकोट्या दिसु लागल्या आणि गड जिंकल्याची एक प्रसन्न भावना थकलेल्या शरीरात एक चेतना जागवुन गेली .... पटापट पावले उचलत आम्ही त्या आगीच्या - शेकोट्यांच्या जवळ पोहोचलो ..!

... सुखरुपपणे गडावर पोहोचलो होतो ... अंधारातही त्या सुंदर आणि रेखिव मंदिराचा अंदाज येत होता .. बुट काढुन बाहेरुनच महादेवाला नमस्कार घातला आणि सकाळी अंघोळ करुन दर्शन घ्यायचे असे ठरले ...विकेन्ड असल्यामुळे सगळीकडे जणु बाजार भरल्याची परिस्थिती झाली होती ... दिवसाबरोबर आलेल्या ग्रुप्सनी आधीच लेण्यांमध्ये आपले संसार थाटल्यामुळे आम्हाला आमचे बि-हाड उघड्यावरच मांडावे लागले ..! ... मातीवर चटई टाकुन - उघड्या आभाळाखाली आम्ही सामानाची आवरा-आवर करुन शेकोटी पेटवली ... बरेचजण थकल्यामुळे पडताच आपापल्या स्वप्नांत गुंग झाले ... ! .. वाढणा-या रात्रीबरोबर थंडीही वाढतच होती .. शेवटी आम्ही तीन दगड मांडुन चुल केली आणि मस्त फक्कड चहा बनवला .... रात्री तीन वाजता थंडीत कुड्कुडत गरमा-गरम वाफाळता चहा म्हणजे ... अम्म.. वा !!! ..... त्या वर्णनासाठी शब्द नाहीत ..!! ... गावी असताना उन्हाळ्याच्या रात्री वाळुवर चटई टाकुन आम्ही अंगणात झोपत असु .... आज ब-याच वर्षांनी ते दिवस अनुभवत होतो..! स्वर्गीय सुखाचा आनंद यापेक्षा वेगळा नक्कीच नसावा !! ..

मी पायाला लावलेला "नविन टायगर - बाम" माझ्या पायांना "जस्ट चिल -चिल ..." म्हणतच होता त्यामुळे ... कुडकुडत ..गप्पा मारत मारत रात्र कधी सरली कळालेच नाही ...! सकाळी लवकर उठुन तारामती शिखरावरुन सुर्योदय पहाणे म्हणजे एक पर्वणीच आहे ... मी - समर - अर्नव आणि निखिल .. गेलो सुर्योदय बघायला ... तारामतीवरुन दिसणा-या त्या उंच डोंगररांगा ... जवळचा तो तलाव [मला नाव माहित नाही हो! ] ... आणि हळु-हळु वर येणारा तो तेजोपुंज ..! अर्नव सारख्या फोटोगिरि करणा-यांना अशी संधी क्वचितच मिळते याची जाणीव ठेऊन भाऊने पटापट जमतील तेवढे फोटो काढुन घेतले ...!

सकाळचे कार्यक्रम उरकुन आम्ही केदारेश्वर गुहेकडे गेलो ... केदारेश्वराचे ते अभुतपुर्व रुप पाहण्यासारखे होते ! .. सकाळच्या कोवळ्या उन्हात सुर्य कीरण त्या ५० बाय ४० फुटाच्या गुहेतील पाण्यावर जणु सुवर्णांची उधळण करीत होते ... कमरे एवढ्या उंचीच्या ... आरपार दिसणा-या त्या पारदर्शक पाण्याच्या मध्यभागी म्हणता येइल अशा अंतरावर अंदाजे साडेतीन फुट कींवा अर्धा पुरुष उंचीचे शिवलिंग होते ... शिवलिंगाच्या चारी बाजुनी चार खांब ... पैकी तीन तुटलेले ... व एक मजबुतपणे उभा.. जणु संपुर्ण गुहा त्या एकावर आधारली होती .... तुटलेले ती खांब म्हणे होवुन गेलेल्या तीन युगांचे प्रतिनिधित्व करतात तर चौथा - कलियुग !!

शिवलिंगाला परिक्रमा घालण्याचा विचार मनात आला व मी कुणालला बोलुनही दाखवला .... गडी क्षणाचाही विलंब न लावता तयार झाला ... लगेच समर - राहुल आणि सुमितही तयार ..! .... पाण्यात पायही टाकु वाटणार नाही अशा थंडगार पाण्यातुन परीक्रमा मारणे म्हणजे .. बापरे ..! एक-मेकांचा हात धरुन "बम-भोले" म्हणत एक परिक्रमा मारली व शिवलिंगाला चक्क स्पर्श करुन नमस्कार केला ... जणु महादेव पुढ्यात उभा ...!! पाण्यातुन बाहेर आलो तेंव्हा कमरेखालील भाग जाणीवरहीत होता .... एव्हाणा विशाल आणि अंजनही तयार होऊन आले होते .. तेही परिक्रमा मारण्यासाठी पाण्यात उतरले ... विशालले "एक डुबकी स्नान" करणे भाग्याचे असल्याचे सांगितले आणि मी चढवलेले कपडे काढुन पुन्हा एक "डुबकी" मारुन आलो ... आज दुहेरी पुन्याचा मौका मिळाला होता .... ! आता मात्र मी पुर्णतः अस्तित्व रहित जाणीव अनुभुवत होतो ....

आमच्या अशा या अभ्यंग - स्नानानंतर आम्ही सरळ मंदिरात गेलो .... सुरुवातीलाच नंदी व पिंडी यांचे दर्शन घेऊन आतमध्ये गेलो.. अनेक मुर्त्या आतमध्ये ठेवलेल्या आहेत .... दर्शन घेऊन आम्ही आता पोटोबाचे बघायचे ठरवले ... समोरच्याच छोट्याशा त्या हौटेलमध्ये पोटभर पोहे खाउन घेतले आणि वारी पुढे - कोकणकडा पहायला निघाली ...!

निसर्गाच्या अनेक चमत्कारांपैकी "रौद्रभिषण" असे ज्याचे वर्णन करता येइल असा हा कोकणकडा ! अगदीच उभा कोसळणारा , इंग्रजी "सी" अक्षरा-सारखा असा निसर्गाचा अविष्कार पाहणेही केवळ अविस्मरणीय !!! केवळ शब्दांत वर्णन नाहीच करता येणार ..! .. येथुन सुर्यास्त पाहणे ही दुसरी पर्वणी .... पहिली - तारामतीवरुन सुर्योदय पाहणे॥!... .... ..... ...... ...... आता परतीच्या वाटेवर ... तीच वाट ... पण दिवसाबरोबर तोलारखिंडीपर्यंत पोहोचण्याचा उद्देश ..! रात्री अंधारात न दिसलेल्या अनेक द-या - डोंगर अनुभवत आम्ही परतीची वाट चालु लागलो ... रात्री अंदाजे ८.३० ला पायथ्याशी पोहोचलो आणि त्याच गतीने सकाळी ५ वा. पुण्यात घरी ..!!

.... एक सांगु.. ? तुम्हाला ट्रेक ... किल्ले ... गड ... डोंगरद-या भेट .. यांची आवड असो नसो ... मात्र आयुष्यात एकदा तरी हरिश्चंद्रगडावर जाऊन या ..!


फोटो येथे पहा..!
...भुंगा!

टिप्पण्या