भटकंती - विकटगड [पेब]


पावसाची वाट बघत बघत जुन महिना कधीचाच संपला.. त्यात कामाचं निमित्त... हे रिलीज - ते रिलीज... हा पॅच - तो पॅच... आणि बरंच काही...! आधीच दुष्काळ त्यात तेरावा महिना!..... ट्रेकींग - भटकंतीला मुहुर्तच लागत नव्हता... गेल्या आठवड्याचा - ४ जुलै चा प्लान होता-होता रद्द झाला.. आता असे प्लान रद्द होणे काही नविन नाही ;) असो... तर गेल्या शनिवारी विकटगड उर्फ पेबला जाऊन आलो. औफिसातले सतिश आणि अर्नब तयार झाले... जुन्या औफिसातुन सुरिंदर, त्याचा मित्र गौरव, ज्यो आणि तिचा नवरा ललित... तर मुंबईहुन विशाल आणि उपेंद्रजी.... चांगले नऊ लोक जमले!

सकाळी ६ ला घरुन निघण्याचा प्लान होता... पण गाडीच आली नाही.. ड्रायव्हर साहेबांना फोन लाऊन लाउन मोबाइलची बॅटरी लो झाली पण साहेबांनी फोनच उचलला नाही.... झाले..! सात - सव्वासातला तो माझ्याकडे - पहिला पिकअप - आला.... चला.. कीमान आला तरी म्हणुन सुरुवात झाली.... रस्त्यात गौरव आणि सुरिंदरला घेऊन आम्ही सतिश आणि अर्नबला पिक-अप केले... आता शेवटचा पिकअप - हिंजवडीचा - ज्यो - ललित... अंदाजे आम्ही आठ वाजता एक्सप्रेसवे पकडला आणि गाडी खोपोली - नेरळ च्या मार्गे [विशाल आणि उपेंद्रजींना घेऊन] माथेरान कडे निघाली... कुठेही न थांबता १० वाजता माथेरानला पोहोचलो. हिरवेगार माथेरान माणसांच्या झुंबडीने गलबलुन गेलं होतं! अगदी बाजार भरल्यासारखं... त्यातच गाईड अन् घोडेवाले यांची विचारपुस! गाडी पार्किंगला लाऊन मस्त नाष्टा केला.... तिकिटं घेऊन [ रु. २५/माणसी, फक्त.] आम्ही ट्रेकला सुरुवात केली..!
विकटगडचा ट्रेक, खरं तर माथेरान च्या जरा खाली, लाइन नं. १३२ किंवा "वौटर पाईप" या ठीकाणी सुरु होतो.. मात्र आम्हाला १३२ नं. - न सापडल्यामुळे आम्ही माथेरानच्या मुख्य एन्ट्री तुन आत गेलो. चालत जाताना मिनिरेल्वेचा ट्रॅक जिथं लागतो, तिथुन उजव्या हाताला वळलं की नं १७८ पासुन, त्या पटरीबरोबर नं. १५७ [अंदाजे] पर्यंत त्याच ट्रॅक वरुन - धबधब्यांच्या बाजुने चालत रहायचं. थोड्याशा पावसानेही सगळं शिवार कसं हिरवंगार झालं होतं.. मधेच येणारे धुक्याचे ढग... छोटे - छोटे धबधबे.. वा! मस्तपैकी फोटो काढत आम्ही चालत होतो.. सतत पडणारा पाऊस मात्र फोटो काढायला अडथळा आणत होता.... पण तशातही आमची कलाकारी चालुच होती...!
नं. १५७ च्या जवळ एक छोटीशी कमान आहे.. म्हणजे या ट्रेकची सुरुवात... कमानीवरची ती छोटी घंटी वाजऊन आम्ही ट्रेकला सुरुवात केली... येथुन खाली उतरावे लागते... पावसामुळे वाट घसरडी झाली होती... त्यामुळे अगदी हळु.. अंदाज घेत आम्ही खाली उतरुन विकटगडाकडे आगेकुच सुरु ठेवली!

गप्पा मारत मारत आम्ही एक-एक टप्पा पार करत होतो... शेवटी गडाच्या मुख्य चढाइला पोहोचलो.. हा पॅच म्हणजे लॅडर - शिडी आहे.. ती पार करुन आम्ही वरती सपाट भागावर पोहोचलो... तिथे पटापट फोटो काढुन गडाच्या मुख्य ठीकाणाकडे निघालो... या पठारी भागावर एक छोटेसे घर[? किंवा मंदिर असावे... आम्ही त्या मार्गे न जाता वळसा घालुन गेलो..!] आहे. त्याच्या समोरुन टेकडी सारख्या भाग पार करुन मुख्य ठीकाणाकडे जाता येते. दुसरा रस्ता खालुन वळसा घालुन जाता येते. म्हणजे.. पठारी भागावर पोहोचल्यानंतर सरळ डाव्या बाजुने चालत रहा... तो रस्ता खाली उतरल्यास गुहेकडे जातो... खाली उतरण्याच्या काही अंतर आधी - अंदाजे ५०० मी. - पाच- सहा दगडी पायर्‍या वरती जाताना दिसतात. या मार्गे वरती दत्त पादुका - मुख्य ठीकाणा - कडे जाता येते. हा रस्ता जरा अवघड आहे. मदतीसाठी एक लोखंडी दोर बांधलेला आहे. त्याचा आधार घेत वरती जाता येते. मात्र पावसात हा रस्ता अगदीच निसरडा असल्याने, तो दोर व्यवस्थित पकडुनच वरती जाता येते. मात्र हा दोर लोखंडी असल्याने काळजी घेणे गरजेचे आहे... काही ठीकाणी खचुन त्यातुन तारा बाहेर आल्या आहेत, तेंव्हा जरा जपुन!

दत्त पादुकांच्या पाठीमागे एका लोखंडी पोलवर भगवा आहे. हेच गडावरचे उंच ठीकाण. येथुन दिसणार्‍या निसर्गाचे - सभोवतालचे वर्णन शब्दांत करणे शक्य नाही... हिरव्या गार डोंगरांच्या रांगा.. धुक्यांचे ढर..... काही डोंगरावर पडलेले ऊन आणि काहींवर ढग.... अप्रतिम - अदभुत - अवर्णनिय !! येथुनच माथेरानच्या मिनि-ट्रेनचे ही दर्शन झाले.. सध्या पावसामुळी ही गाडी प्रवाशांसाठी बंद आहे... मात्र आम्हाला तिचे दर्शन झालेच.... कदाचित रुटीनचा भाग - किंवा ट्रॅक चेकिंग असावे.


पादुकांचे दर्शन घेऊन आम्ही त्याच मार्गाने खाली उतरु लागलो... चढताना काहीसा जाणवणारा त्रास, उतरताना फारच होत होता... त्यात ज्यो आणि ललित पहिल्यांदाच असा प्रयत्न करत होते... त्यामुळे त्या दोघांना व्यवस्थित खाली उतरवणे गरजेचे होते. रस्सी बांधुन त्यांना हळु-हळु खाली उतरवले आणि गुहेच्या दिशेने आम्ही चालु लागलो.

धुक्यामध्ये रस्त्याचा अंदाज येत नव्हता.... या ठीकाणी एक रस्ता/ वाट लागलीच खाली जाताना दिसते.. मात्र ही वाट रिस्की आहे... मी थोडं पुढं जाऊन दुसरी वाट सापडते का ते पाहिले आणि सापडली ही! दगडात खणुन पायर्‍या केलेली एक छोटीशी वाट खाली जाताना दिसली... सावकाश खाली उतरल्या नंतर डाव्या हाताला पाण्याचा एक कुंड आहे... त्याखाली हनुमानची एक छोटीशी मुर्ती ..! आता येथुन खाली उतरण्यासाठी एक लॅडर - शिडी आहे. हे शिडी अगदीच उभी आहे.. त्यामुळे खाली उतरताना पाय व्यवस्थित शिडीवर ठेवणे गरजेचे! शिवाय पाण्याचा फ्लो ही शिडीवरुनच खाली वाहतो, त्यामुळे पाण्याचा हलकासा मार खाण्यासही सज्ज रहा! डोंगराच्या बाजु-बाजुने गुहेच्या ठीकाणी जाता येते.

अंदाजे ४ वा. आम्ही गुहेशी पोहोचलो.... आतापर्यंत पोटातले कावळे बोंबलुन बेशिद्ध पडले होते.. सोबत आणलेले स्नॅक्स खाऊन आम्ही १०-१५ मि. विश्रांती घेण्यास बसलो.... तोपर्यत गुहा बघुन झाली.. दोनही गुहा चांगल्या परिस्थितीत आहेत.. रात्री राहण्यास योग्य! मात्र पावसाची आत्ताच सुरुवात असल्याने म्हणा.. किंवा अजुन लोकांचे राहणे सुरु झाले नसल्याने म्हणा... दोनही गुहा बर्‍यापैकी स्वच्छ होत्या.... पैकी डाव्या - मोठ्या गुहेत स्वामी समर्थांचे मोठे पेंटिंग आहे तर दुसर्‍या गुहेत गणेशाचे मुर्तीवजा पेंटिंग. बाहेरच्या बाजुला समर्थांच्या गादी सदृश एक बैठक - टाइल्स बसवुन केलेली आहे... कदाचित येथे येणार्‍यांनी ती स्वतःची समजुन थोडी घाणही केली होती.... मी आणि विशालने जवळच्या पाण्याने जरा स्वच्छ केली. एव्हाणा अंधार होऊ लागला होता... आणि आम्हाला त्या आधी नेरळला पोहोचणे गरजेचे असल्याने आम्ही समर्थांना नमस्कार करुन उतरणीला लागलो..... नेरळला उतरणार म्हणुन माथेरानला पार्क केलेली गाडी - ड्रायव्हरला फोन करुन नेरळ स्टेशनला घेऊन येण्यास सांगितले!

आतापर्यंत सरळ असणारी वाट येथुन पुढे जरा फसवी आहे... बर्‍याच ठीकाणे उप-वाटा असल्यामुळे चांगलीच फसगत होण्याची शक्यता आहे. आमच्या [वाचलेल्या] माहिती नुसार - जर तुम्ही नेरळच्या बाजुने चढत असाल तर - भला मोठा विजेचा खांब - हे रस्ता बरोबर असल्याचे चिन्ह आहे, असं समजण्यास हरकत नव्हती..... आणि आमच्या डाव्या हाताला असा विजेचा खांब दिसत होता... !! तो खांब साक्ष ठेऊन आम्ही चालत होतो. पुढे गेल्यानंतर पुन्हा एक दगडी पॅच येतो.. अंदाजे ७-८ फुटाचा हा पॅच उतरताना अगदी जेरीस आणतो. विशालने आधी खाली उतरुन सर्वांना खाली उतरण्यास मदत केली आणि एक-एक करत आम्ही खाली आलो.... थोडं अंतर गेल्यानंतर एका ठीकाणी छोटासा चौक येतो... हा सर्वात महत्वाचा चौक आहे!
तुम्ही जर गडावरुन खाली उतरत असाल तर तुम्हाला उजव्या बाजुला खाली उतरायचे आहे - नेरळच्या बाजुला.... हे चांगलं लक्षात ठेवा.... सरळ जाणारा रस्ता पुढे बंद होतो.... मी स्वत: चेक केलाय... आणि डाव्या हाताला पनवेल! आता हे मी सांगु शकतोय - कारण आम्ही डाव्या बाजुनेच खाली उतरलो!!!! नेरळच्या बाजुने चढत असाल तर अडचण नसावी. मात्र माथेरान च्या बाजेने चढुन - नेरळच्या बाजुला उतरत असाल तर हा - उजवा - रस्ता पक्का लक्षात ठेवा!
डाव्या हाताला दिसणार्‍या त्या विजेच्या खांबावर भरोसा ठेऊन डाव्या बाजुने खाली उतरायला सुरुवात केली... रस्ता अगदीच सरळ होता.. मात्र छोटासा आणि निसडाही! त्या मोठा विजेच्या खंबाच्या खालुन चालत आम्ही वळणा-या वाटेने सुमारे एक दिड तासाने खाली उतरलो... अंदाजे ७ वाजता! सुरुवातीलाच काही घरे लागली... एक माणुस जवळच भेटला... म्हटले चला... नेरळचा रस्ता विचारु! आणि.. आणि.. त्याने सांगितले की - आम्ही नेरळच्या बाजुने नाही - तर - पनवेलच्या बाजुने खाली उतरलो आहोत...हे "सत्ती" नावाचे गाव आहे! नेरळकडे जाण्यासाठी वरच्या त्या छोट्या चौकात आम्ही उजव्या बाजुने खाली उतरायला पहिजे होते!!! अगदी विजेचा झटका लागल्या सारखे झाले.... म्हणजे आता परत जंगलातुन त्या पहिल्या विजेच्या खांबापर्यंत वरती जायचे??? नाही...s s s s s s s s s s s s!!!

............................ s s s s s! फोन करुन गाडीच इकडे मागवावी असं मत झाले.... फोन करण्यासाठी मोबाइल काढला तर नेटवर्क गायब! शेवटी त्याच माणसाला विचारले - आता पनवेलला कसे जाता येईल ?... सात वाजता एस.टी. बस येते... सगळ्यांचा नजरा घड्याळावर.. ७.१० झालेले.. म्हणजे - बसही गेली असणार! तो माणुस म्हणाला - कधी कधी बस थांबतेही... तेंव्हा तुम्ही समोरच्या गावात - माळढुंगे - जाऊन तिथुन बस पकडा.. किंवा सिक्स सीटर मिळाले तर बघा! आता आली का पंचाईत? आम्हाला वाटले की बस याच गावातुन आहे.... पण आता बस १५-२० मि. अंतरावर असणार्‍या "माळढुंगे" गावातुन होती.... आधीच अंधार पडायला लागला होता...आणि पुन्हा रस्ता चुकु नये म्हणुन - विशालने त्याच माणसाला रस्ता दाखवण्यासाठी येणास विचारले... नाही - नाही म्हणत अखेर ५० रु. तो बस थांब्यापर्यंत येण्यास तयार झाला.... तो पुढे आणि आम्ही त्याच्या मागे.... चलो माळढुंगे!!
बसच्या ठीकाणी पोहोचलो.... तर कळाले की... आजुन बसच आली नाही.. म्हटले चला.. अजुनही होप आहे... पण आमची ही होप जास्त वेळ नाही टिकली... आज बसच येणार नसल्याचे समजले! आता? सगळ्यांचा मनात एकच - वी आर लौस्ट - मुझे इस जंगल से बचावो... वगैरे - वगैरे...!
एव्हाना.... सगळ्यांनाच चहाची तलफ झाली होती.... वहानाची वाट बघत - चहाची सोय होते का ते विचारले... तर कोरा चहा - ब्लॅक टी - मिळेल असे सांगितले... दुधाचा का नाही - तर - सगळा गावच असा कोरा चहा पितो असं कळालं! चला - कोरा तर कोरा.... गरमा - गरम चहा तर मिळाला - यावरच आम्ही हुरळुन गेलो! आता चर्चा सुरु झाली... पुढे काय... ? येथुन जवळचे ठीकाण म्हणजे - पनवेल - १२ कि.मी.... पण... पनवेलला कसे पोहोचायचे?.. की या गावातच मुक्काम करायचा?

चहा संपता - संपता, एक सिक्स सीटर आली... आणि आमच्या जिवात जीव आला...आता जबाबदारी त्या सिक्स सीटरवाल्याला - पनवेलला सोडण्यासाठी पटवणे... ६०० वरुन ४०० मध्ये तो १२ कि.मी. - पनवेलला सोडण्यास तयार झाला..... सगळे बसलो.... अन आता - चलो पनवेल....! माथेरान वरुन - नेरळला बोलवलेली गाडी आता पनवेलला बोलावणे गरजेचे होते.... पण नेटवर्कच नसल्याने - काहीच करु शकत नव्हतो...! पाच - सहा कि.मी. गेल्यानंतर मोबाइला रेंज मिळाली आणि पटकन ड्रायव्हरला फोन केला...! आणि गाडी - जुन्या पनवेल बस स्टेशनला मागवली.... सर्वांच्या जिवात जीव!
ज्यो आणि ललित साठी तर हा प्रकारही ट्रेकिंग इतकाच नविन होता... जंगल.. ट्रेक... रस्ता चुकणे... कोरा चहा.... सिक्स सीटरच प्रवास...! सर्वच..!!पण दोघांची काहीही तक्रार नव्हती.... एंजाय करतोय असं त्यांचं मत होतं!
अंदाजे ९ वा. आम्ही पनवेलला पोहोचलो.... गाडी येण्यास अजुन एक तास तरी लागणारच होता.. तोपर्यंत - "विनम्र" मध्ये खाऊन घेण्याचे ठरले... मस्तपैकी चिकन कोल्हापुरी खाल्ले...गौरवने मात्र व्हेज मागवले... नंतर समजले - चतुर्थी आहे...! असो... आमच्या देवाला चालते म्हणुन मस्त खाऊन घेतले... १०.३० ला गाडी पनवेलला पोहोचली... विशाल - उपेन्द्रजींना बाय-बाय करुन आमची सोमु [सुमो!] पुण्याच्या मार्गाला लागली....!

दुसरे जातात म्हणुन मलाही जायचे आहे, म्हणुन " उठला अन् ट्रेकला सुटला " असं मात्र करु नका....!!
  • ट्रेकला जाण्यासाठी आधी तयारी करा...ट्रेकिंगचे शुज [एक्शन्चे ट्रेकिंग शुज चांगले आहेत.] असणे हे फार महत्त्वाचे!... दोर - रोप नेहमी जवळ ठेवा.
  • ट्रेकिंगच्या जागेची पुर्ण माहिती मिळवा... त्या जागेचे महत्त्व ... इतिहास जाणा..
  • गडांवर मस्तीसाठी जाऊ नका... मोठमोठ्याने ओरडणे.. गाणी लावणे हे टाळा... त्यासाठी स्वत:चे घर किंवा पब्स आहेतच ना!
  • आपण बरोबर नेलेला कचरा.. प्लीज.. प्लीज आपल्या बरोबरच खाली आणा!
  • गडांवरील बरीचशी ठिकाणं काळाच्या ओघात जीर्ण झाली आहेत... तेंव्हा अशा ठीकाणी खेळ आणि पळापळ करुन उगाचच रिस्क घेऊ नका...!
  • ट्रेकिंगच्या ठीकाणी असलेल्या झाडांना - फुलांना जपा...!
सर्वांना सोडत - सोडत मला घरी पोहोचायला रात्रीचे २ वाजले.... थोडसं तेल अंगाला चोळुन .. मस्त गरमा - गरम पाण्यात अंघोळ केली अन् अंथरुणात घुसलो...!

नेहमीप्रमाणे फोटो येथे आहेतच!!