भटकंती: शिडीच्या वाटेने - भीमाशंकर!

पेबच्या भटकंती नंतर आता पुन्हा पावसाळी ट्रेकची स्वप्नं पडु लागली होती.... पण कुठं जायचं... तसे पर्याय भरभुर होते, पण विशाल म्हटला की त्याला भीमाशंकरला त्रिशुल आणि शिवलिंग यांची पुजा करुन स्थापना करायची आहे... मग काय.. भीमाशंकर लाच जायचं ठरलं... मेल - फोनची देवाण-घेवाण झाली आणि १ ऑगस्टला भीमाशंकरचा जंगल ट्रेक करायचा ठरला! इंटरनेवरुन बरीच माहिती काढली... कसं जायचं... कुठ रहायचं... आधी जाऊन आलेल्यांकडुन माहिती घेणं वगैरे - वगैरे! शिडी घाट की गणेश घाट असा वाद बराच रंगला.... कारण शिडी घाट म्हणजे "वन्स इन लाइफटाइम" म्हणता येइल असा थ्रिलिंग आहे, अंदाज एकंदरीत माहितीवरुन आला होताच! तेंव्हा तिथे जाऊनच ठरवु असे ठरवुन पुढच्या तयारीला लागलो.
कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्रमाथां मुकुटीं झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदु:खहारी । तुजविण शंभो मज कोण तारी ॥ १ ॥
पुर्ण वाचा...

आमच्या ऑफिसमधुन मी, अर्नब, सतिश, अमोल आणि दोन मित्र - सुरिंदर आणि रवि असे पुण्याहुन सातजण तयार झाले.... तर मुंबईहुन विशाल, उपेंद्र, स्टीव्ही, विशालची बहिण अर्चना आणि तिची मैत्रीण रचना असे पाच जण... एकंदरीत बारा लोक.. पुण्याच्या बर्‍याज जणांना शनिवारीच परत यायचे होते त्यामुळे आम्ही मुक्काम रद्द केला... असो.. तर नेहमीचीच ठरलेली जीप - सुमो घेऊन आम्ही सकाळी सातला पुण्याहुन निघालो... एक्सप्रेसवे - खोपोली - कर्जत करत, अंदाजे ९.३० ला "खांडस" या गावात पोहोचलो... मुंबईकरांना ट्रेन लेट झाल्यामुळं १२.३० वाजले.. तो पर्यंत आम्ही हलकासा नाष्टा करुन घेतला... आणि शिडी घाटाने जाण्यासाठी एक गाइडही ठरवला. गाइड ठरवताना शक्यतो तरुण ठरवा - कारण शिडी घाटामध्ये त्याची मदत लागतेच!

मुंबईकर आल्यानंतर वेळ न घालवता आम्ही खांडस गावातीतुन आमच्या मार्गी लागलो. ह्या डांबरी रस्त्याने अंदाजे २ की.मी. चालल्यानंतर एक आडवा रस्ता लागतो. उजव्या हाताला जाणारा रस्ता गणेश घाटातुन जातो तर ओढ्याच्या जवळुन जाणारी पायवाट शिडीघाटाकडे जाते. सोबत गाइड असल्यामुळे आम्ही जास्त डोकं चालवण्याच्या भानगडीत पडलोच नाही...! पुन्हा एकदा सर्वांची संमती घेऊन आम्ही शिडी रस्त्याने जायचे नक्की केलं आणि त्या मार्गे चालुही लागलो! समोरचा हिरवागार डोंगर जणु खुणावतच होता... दुरुन दिसणारे शिडी घाटातले दोन धबधबे त्यात भरच घालत होते... त्यांच्या खाली दिसणारा काळा कातळ दगड मात्र शिडी घाटाचा अंदाज देत मनात धडली भरवणारा!

गप्पा मारत मारत आतापर्यतचे अंतर अगदीच आरामात कापले होते...अंदाजे अर्ध्या तासाने एक छोटासा ओढा लागतो... सगळ्यांनी मस्त चेहर्‍यावर पाणी मारुन - पिऊन घेतले... सकाळपासुन आम्ही पावसाची अपेक्षा करत होतो.. मात्र पाऊस पडण्याचे नावच घेत नव्हता... हवेतील उकाडा आता जाणवायला लागला होता.. पाण्यात भिजऊन मी रुमाल डोक्याला बांधला... तेवढाच थंडावा! काही वेळानं आम्ही पहिल्या शिडीच्या जवळ पोहोचलो... अगदी सोपी वाटणार्‍या ह्या शिडीजवळ पोहोचल्या नंतरच तिचा अंदाज येतो.... खालुन दुसरी आणि वरुन पहिली पायरी तुटलेली ही "पहिली शिडी"! पहिली शिडी ही दोन दगडी पॅच जोडते.. तेही अगदी उभी [ मात्र ९० अंशात नक्कीच नाही]... मध्ये - खाली पाहिलं तर खाई! तेंव्हा अगदी सावधानतेनेच ही शिडी पार करा.

पहिली शिडी पार केल्यानंतर लागणारा दगडी पॅच अगदी तुमच्या हाताची शक्ती अन् तुमच्या मनाच्या तयारीचा अंत पाहणारा....! खाली पाय ठेवायला एखादी खाच.... त्या कातळ दगडाच्या खाचीत हात घालुन आपले पुर्ण वजनहातावर सांभाळत पुढे सरकावे लागते. याचवेळी आपल्या वाढलेल्या वजनाचा अन् पोटाच्या घेराचा खरा अंदाज येतो! स्वतःला उभारण्यापुरती जागा पाहुन मी एकेकाला पुढे जाण्यासाठी - त्यांच्या पाठी - दरीच्या बाजुना उभा राहुन आणि "यु कॅन डु इट!" असा मॉरल सपोर्ट देत - देत एकेकाला पुढं पाठवत होतो.... याच ठीकाणी "शांताराम" नावाच्या गाइडने केलेली मदत ही न विसरण्यासारखी! त्याच्या मदतीचे आभार माणण्यासाठी १०० रु. देऊ केले... मात्र ही त्याच्या मदतीची अन् चांगुलपणाची किंमत नक्कीच नाही....! तुम्ही जर प्लान करत असाल तर खांडस गावातुन "शांतारामला" जरुर बरोबर घ्या!

पहिली शिडी पार केल्यानंतर जवळच दुसरी शिडी आहे.. ही पहिली पेक्षा जरा लांब... मात्र कोणत्याच शिडीला खालुन वरुन सपोर्ट नसल्यामुळे बर चढताना बरीच हलत होती..... शिवाय थंडगार पाणीही अंगावर उडतच होते.. पाऊस असता तर कदाचित वरुन पडणार्‍या पाण्याचा मार जोरदार लागला असता.... आणि शिवाय हा रस्ताही अधिकच रिस्की झाला असता! सर्वांना पुढे धाडत ... खांद्यावरची ती चार पाच किलोची सॅक सांभाळत मी सर्वात शेवटी मी दुसरी शिडीही पार केली!

दुसर्‍या शिडीनंतर थोडीशी उभी चढण आहे... सावध - सांभाळत आंम्ही तिसर्‍या शिडीपर्यंत पोहोचलो... ही शिडी सर्वात नविन म्हणता येइल.. आधी हिच्या जागी लाकडी शिडी होती... पावसाळ्यात काय हालत होत असेल ना? माझ्या माहितीनुसार धुमकेतु ग्रुपने ही शिडी - लोखंडी - बसवली आहे... अशा या मोक्याच्या ठीकाणी शिडी लावुन रस्ता केल्याबद्दल त्यांचे अनेक आभार! शिडी इतर दोन शिड्यांपेक्षा जरा लांबच आहे.. शिवाय - खाली आणि वरती फक्त टेकवली असल्याने भकाम असा सपोर्ट नसल्याने पुन्हा हवेतच! या शिड्या चढताना आपले वजन शक्यतो पुढच्या बाजुला झुकलेले ठेवा.... म्हणजे शिडी नेहमी पुढच्या बाजुने दगडाला चिटकुन राहील...!

ही शिडी संपली की पुन्हा थोडी उभी दगडावरची चढण आणि एक वळण - उजव्या हाताला. हे वळण घेताना, शेजारच्या दगडाला गोल - पकडुनच सरकत रहा... शक्यतो खाली पाहु नका...! या ट्रेकचा बराचसा भाग एका-वेळी-एकच जाऊ शकेल असा आहे.... त्यामुळे घाई - गडबड करु नका...आणि हो.. स्वतःवर विश्वास ठेवा.... भीतीमुळे तुम्ही अर्धे अवसान गाळुन बसला तर तुमची ही अवस्था तुमच्या बरोबर इतरांनाही त्रासदायक ठरते!

हे वळण घालुन थोडं पुढे काही अजुन अंतर चालल्या - चढल्या नंतर मस्त धबधबा लागतो.. [पहिल्या फोटोतल्या दोन धबधब्यांपैकी हा डाव्या हाताचा!]..... बस्स! सगळी मंडळी या ठीकाणी थोडा आराम म्हणुन बसलो... पैकी काहीजण लगेचच धबधब्याखाली गेले.. मस्त पाण्याखाली भिजुन, खाण्यासाठी बसले.... गुड-डे, खजुर आणि मुंबईवाल्यांनी आणलेल्या ब्रेड - बटरवर मस्त ताव मारला.... मात्र पोट भरुन जेवणाचा - खाण्याचा मोह अशावेळी टाळावाच लागतो.. नाहीतर बाकीचं अंतर चालणे होणारच नाही....! गाइड काका चला - चला.... अजुन बरंच जायचं आहे असं म्हणुन सर्वांना पुन्हा मार्गी लावत होते... एकंदरीत आम्ही शिडीचा - अवघड भाग पार केला होता.. मात्र अजुन बराचसा भाग चढायचा बाकी होता... मग.. पुन्हा चढाइला सुरुवात!
बाकी ... खाल्ल्यानंतर ... आपण आणलेला आपला मौल्यवान कचरा पुन्हा आपल्याच बॅगेत भरुन परत न्या! शहाण्यासी पुन्हा - पुन्हा सांगणे न लगे!..!

हा चढ संपला की मस्त पठार लागते... थोडयाच अंतरावर एक झोपडीवजा चहाची सोय असणारे हॉटेल [?] दिसते... गाइडकाकांनी पुन्हा समोरचा डोंगर दाखवत तो चढायचा असल्याचे सांगितले....म्हणजे अजुनही जवळ - जवळ अर्ध्याहुनही जास्त अंतर पार करायचे बाकी होते!.. तेंव्हा मात्र सगळेच त्या झोपडीत घुसले... चहा पिल्यावरच पुढे - एकच कल्ला!.. मग काय.... तेरा चहा... [अमॄततुल्य चहाची अपेक्षा मनात सुद्धा आणु नका!]... पित - पित .. काहींची फोटा-फोटी - फोटोगिरी सुरु... मात्र पुन्हा गाइड सायबांच्या आज्ञेला मान देऊन पुढचे चालणे - पठारी - सुरु झाले.. समोरच्या डोंगरावर चढणारी मंडळी आता नजरेत भरु लागली होती... काही अंतरावरच गणेश घाट आणि ह शिडी घाट रस्ता एक होतो... आणि मग दोन्ही रस्त्याचे मुसाफिर एकाच मार्गाने वाटचाल सुरु करतात!
भीमाशंकरचा जंगल ट्रेक करण्यासाठी शारिरीक तयारीबरोबर तुमची मानसीक तयारीही फार महत्त्वाची.. कोणत्याही ट्रेक - भटकंती मध्ये मनात कधीही - मला शक्य नाही किंवा मला जमणार नाही असं आणु नका... बरेच कठीण प्रसंग अगदी तुमच्या इच्छा शक्तीच्या पुढे सहज सोपे होतात... मात्र तुमची माघार तुमच्या बरोबर असणार्‍या साथीदारांनाही कमजोर करते!
जिथे हे दोन रस्ते मिळतात त्या ठीकाणी मोबाइल नेटवर्कही मिळाले.. लागलीच सर्वांनी "घरी यायला उशीर होइल - सुखरुप आहोत" सांगुन टाकले!.... या ठीकाणी झोपडी सारखे हॉटेलही [२] आहेत.. तुम्ही जर परत उतरणार असाल तर जेवणाची ऑर्डर देऊ शकता.... मस्त चिकन वगैरेचा बेत होऊ शकतो.... पण श्रावणात नक्की सांगता येणार नाही.... आणि शिवाय - देवाला - देव कार्याला गेल्यानंतर वेज खाणंच योग्य, नाही का?

चालुन चालुन सारेच दमले होते... शिवाय.. त्या जंगलात चावणारे लहान-लहान कीडे आणि त्यानंतर होणारी खाज यामुळे सगळेच पिसाळुन गेले होते..काही लोकं जे शॉर्टवर आले होते, त्यांचे पाय, विशेषतः, अगदीच लाल-लाल झाले होते... जिकडे - तिकडे लाल टिपके..! आधी म्हटल्या प्रमाणे ही वाट अरुंद असल्यामुळे एका वेळी एकच जाऊ शकतो... त्यामुळे बर्‍याच ठीकाणी ट्राफिक जाम झाल्यासारखं वाटत होतं शिवाय लांबच्या लांब रांगही होतीच... मुंग्यासारखी ..... या ठीकाणी वाटेत अवघड म्हणण्यासारखे पॅचेस नाहीत मात्र बराच वेळ चढाई करत रहावे लागते!

जस जसं वरती चढत होतो.. तस तसं धुकं वाढत होतं.... मात्र .. वातावरण प्रसन्न होत चाललं होतं.... मला स्वत:ला तरी बरंच हलकं आणि फ्रेश वाटत होतं... रस्त्यात अनेक वृद्ध लोकही अगदी विश्वासानं चालताना तर काही अगदी अणवाणी [चप्पल वगैरे न घालता] चालताना दिसले... काही वेळानं धुक्यात अगदी पुर्णपणे हरवलेलं तलाव दिसलं.. काही लोक तिथं स्नान [डुबकी] करत होते... मी आणि इतर काहींनी - बम - भोले म्हणत- झटपट पाण्यात एक-एक डुबकी मारुन घेतली.... वर - वर ठीक वाटणारं पाणी अगदीच चिल्ड होतं, हे पाण्यात उतरल्यावरच जाणवलं! पटापट कपडे बदलले... तो पर्यंत बाकीचे लोक येउन थांबले होते..!..त्या प्रसन्न वातावरणात दुरवर टाळ - घंटानादाचा आवाज जाणवत होता!

एव्हाना ट्रेक सुरु करुन [१ ते६] पाच तास झाले होते... दाट धुक्यात मंदिर शोधणं जरा अवघडच वाटलं.. पण पाणी भरायला आलेल्या एकानं मंदिराचा रस्ता दाखविला.... त्या धुक्यांत अगदी जवळच घंटा - टाळ वाजण्याचा आवाज अस्पष्ट ऐकु येत होता.. आवाज्याचा दिशेने आम्ही पुढं चालत राहिलो आणि अगदी धुक्यात गुडुप झालेलं मंदिर दिसु लागलं! ................................
.......................................................
..................................................................

................................. खांडसला आम्हाला सोडुन गाडी पुन्हा भीमाशंकरला बोलावली होती... त्यामुळे पार्किंगमध्ये गाडी शोधुन त्यात बॅगा वगैरे टाकुन आम्ही दर्शनाला रांगेत उभारलो! रांगेत असतानाच आरतीही सापडली... नशिबवानच - आम्ही सारे! आरती नंतर पिंडीवर डोकं टेकवुन शिवाचं दर्शन झालं... मन आणि शरीर अगदी ताजं - तवाणं..! मंदिराचं बांधकाम अगदी भक्कम दगडी आहे.... अंदाजे १४०० वर्षापुर्वीचं असावं! समोरच शनिचं छोटसं मंदिर.. वरती चिमाजी अप्पांनी वसईहुन आणलेली घंटा बांधली आहे! त्याच्या बाजुलाच दिपमाळ ...! अजुनही काहीसं डाग-डुजींचं काम चालु आहे वाटतं... !

दर्शन होईपर्यंत ८.३० वाजले आणि आता आम्हाला परतीचा विचार करावा लागला.. मुंबईकरांच्या राहण्याची सोय करण्यातच पुन्हा दोन तास गेले... मंदिराच्या आवारातच असणार्‍या खोल्यांत राहण्यास "त्या मुली" तयार नसल्याने पुन्हा शोधा - शोधी सुरु!... एक हॉटेल मिळालं.. ५-७ कि.मी . अंतरावर.. आणि आमची गाडी त्यांना सोडण्यास गेली... मात्र दाट धुक्यात काहीच दिसत नसल्याने १० मिनिटात सारे परतले... आणि त्यांना मंदिराच्या आवारातच रहावे लागले! ... असो.. त्यांना सोडुन आम्ही ११ वाजता आमच्या मार्गी लागलो... पण समोरचं काहीच दिसत नव्हतं! फुल लाइट लाऊनही! ड्रायवरला काचेवर तंबाखु चोळायला सांगुन... कागदाने काच साफ केली... काचेवर थोडा तरी फरक पडला... मात्र समोरचं धुकं हटायला तयार नव्हतं... समोरुन एक इंडिका वाला काही अंतर जाऊन परत आला होता आणि आम्हालाच राहण्याचा पत्ता विचारत होता....!
शेवटी बॅटरी हातात घेऊन मी, सुरिंदर आणि अमोल असं तिघांना काही अंतर जीपच्या समोर रस्ता दाखवत चालायचं ठरवलं... आणि त्याप्रमाणं आमचा परतीचा प्रवास सुरु झाला!
समोरुन येणार्‍या वहानांना लाइट दाखवुन - हळु करत आम्ही चालत होतो....एक - दीड कि.मी. नंतर धुकं मावळलं आणि आणि आम्ही पुन्हा गाडीत बसलो....!

पोटातले कावळे आतापर्यंत मरायला टेकले होते... ढाबा - हॉटेल शोधत राजगुरुनगर आले आणि आम्ही एका ढाब्यावर इथेच्छ जेवण केलं!.... रात्रीचे १.३० वाजले होते...जवेणानंतर सारे, गाडीत मस्त झोपुन गेले...! सकाळी ३.३० ला माझा शेवटचा ड्रॉप झाला...!

घरी पोहचुन मस्त फ्रेश झालो...आणि लागलीच बिछान्यात घुसलो!

हुम्म... नेहमी प्रमाणे.. काही फोटो येथे आहेतच!


काही आठवणी:
  • खांडसमधेच उशिर झाल्यामुळे आम्हाला आंधार पडण्याआधी जंगल पार करणे आवश्यक होते.... मात्र शिडीघाटामुळे काही वेळ वाचवण्यास मदत झाली!
  • या अभयारण्यात आढळणारा शेकरु - खारीसारखा - प्राणी आम्हाला दिसलाच नाही!
  • धुक्यामुळं पुन्हा गाडीच्या पुढं रस्ता दाखवत चालावं लागत होतं... जणु- डु वन ट्रेक अँड गेट वन फ्री!
  • जर तुमचा राहण्याचा प्लान असेल तर त्याचं प्रयोजन आधी च करा... ६-७ कि.मी. वर ब्लु मर्मोन नावाचे हॉटेलआहे..


थोडक्यात भीमाशंकर!

टिप्पण्या

रोहन... म्हणाले…
अरे वा.. माझ्या अत्यंत आवडत्या अश्या ठिकाणी ट्रेकला जाउन आलास रे... मला जाउन ५ वर्ष तरी झाली असतील मात्र. आम्ही ५ जण गेलो होतो. हा धूवाधार पाउस आणि ओल्या झालेल्या शिडया. सॉलिड थिलिंग ट्रेक झाला होता.

त्या पाहिल्या शिडीची अवस्था अधिकच बिकट झालेली दिसते आहे रे. आणि माझ्या मते पहिल्या शिडी नंतरचा रॉकपॅच आणि दूसरी शिडी ही सर्वात कठिण आहे. वर चढल्या-चढल्या ते एक झाड़ आहे बघ. ते पकडून लगेच डाव्या बाजूला सरकावे लागते. भन्नाट एकदम. वर गेल्यानंतर एका रॉकला पकडून वळसा घालावा लागतो तो सुद्धा सॉलिड आहे.
Deepak म्हणाले…
@रोहन!
अगदी बरोबर! .. हरिश्चंद्रगडानंतर हा अनुभव दुसर्‍यांदा आला.... थ्रिलिंग... सिंपली ग्रेट!
रोहन... म्हणाले…
भटकंती मध्ये मनात कधीही - मला शक्य नाही किंवा मला जमणार नाही असं आणु नका... बरेच कठीण प्रसंग अगदी तुमच्या इच्छा शक्तीच्या पुढे सहज सोपे होतात... मात्र तुमची माघार तुमच्या बरोबर असणार्‍या साथीदारांनाही कमजोर करते!

एकदम बरोबर बोललास ... ह्याचबरोबर एखाद्या कच्च्या भिडूला आपण एनकरेज कसे करतो ते पण महत्वाचे आहे.. बरं ती 'शेकरू' काही सहजा-सहजी नाही दिसत बरं का... खास करून पावसाळ्यात.

आणि हा राहायची माझी एक जागा आहे तिकडे. ;) पूर्ण वरती चढून आलात ना की एक तळे लागले का तुम्हाला? तिकडेच उजव्या हाताला आतमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटचे एक बंद घर आहे. त्याबाहेर राहता येते. आम्ही तिकडेच राहिलो आहोत दोन्ही वेळेला. पण धुके असताना नीट शोधावे लागते.

मी लडाख वरुन परत आलो की शिडीघाट मार्गे जाणार आहेच. तो पर्यंत भटकंती जिंदाबाद.

Happy Trekking friend ... !!!
Pankaj - भटकंती Unlimited म्हणाले…
फारच भारी.. आता लवकरच भीमाशंकरदर्शन करायला हवे. गणेश घाटपण असाच आहे असे ऐकले होते.
बाकी मधेमधे फोटोंची पेरणी सुरेख. "शहाण्यासी पुन्हा - पुन्हा सांगणे न लगे!..!"ला लिंक देऊन मस्त पुणेरीपणा दाखवलाय :-) पण असे मधून मधून हौशे-नवशे-गवशे ट्रेकर्सचे कान टोचावेच लागतात.

दार्या घाट आणि ’बाळूगड’ ट्रेक करून आलो परवा... ब्लॉग वर पोस्ट आहेच.
Unknown म्हणाले…
sahi re ikdum mast .. tuze likhan itake prabhavi asete ki aapn office madhe nasun trek varch ahot ase vatate.. thank you very much for sharing .
Deepak Parulekar म्हणाले…
Awesome Man !!!! I am also planning for this trek in this month....
------Vishal------ म्हणाले…
chala pudhcya treakchi tayari karuyat,,,,, dhak....maze gram daivat...pan september madhe ok, aata nako...
Deepak म्हणाले…
@पंकज - त्याच त्याच सुचना वारंवार सांगणे जरा बोअरिंगच असतं... पण असे डोस दिले की लोकांच्या लक्षात रहायला सोपं जातं.. म्हणुन ही सगळी खरडपट्टी!
@जयश्री - बरं वाटलं प्रतिक्रिया वाचुन...!
@दीपु - शिडी वाटेनं जाणार असाल तर काळजी आणि गाइड बरोबर घ्या .. तो "शांताराम" :)

... प्रतिक्रियांबद्दल अनेक आभार!
Deepak म्हणाले…
@ हे हिंदवी स्वराज्य...
जाऊ या ना... ५ सप्टें..... काय म्हणतो?
davbindu म्हणाले…
मस्त व्हर्चुअल ट्रेक करवलीस आम्हाला.
मी कधीही गेलो नाही तिथे पण तुमचे ट्रेक वर्णन
(सर्व तपशिलासह) वाचून असे वाटले मीच तिथे जावून आलो.

बाकी भन्नाट,रोकिंग,थिलिंग...
Deepak म्हणाले…
@दवबिंदु,
धन्यवाद दोस्त.... बघ कधी जाता आलं तर!
Jagdish Patil म्हणाले…
mast lihile aahes re mitra ...wachtana trek karat aahot ase watale ... seems tumhi ha trek 1-2 augustlach kelay watate ... tya waterfall mule watate ... same tasech photo aahe ... aamhi pan ha trek 2 august lach kela ... shidi ghatane ascend tar mastach pan descend pan kartana jam maja aale .. jabar thrilling ..
Deepak म्हणाले…
@जगदिश,
हो, आम्ही १ ऑगस्टला गेलो होतो... शिडी घाटातुन आम्ही वरती गेलो..मात्र त्याच दिवशी परतायचं असल्यानं आम्ही वरुनच पुण्याला परत फिरलो.
एक मात्र नक्की - शिडी घाट उतरताना अधिकच अवघड अन् थ्रिलिंग असावं!

प्रतिक्रियेबद्दल आभार!
HAREKRISHNAJI म्हणाले…
This route is very interesting. I had gone to Bhimashankar via this route some 22-25 years back.
There are many other intersting routes to Bhimashanakar. Another route via Peth (Kothaliagd ) is also interesting.
भानस म्हणाले…
भुंगा, एकदम मस्त सफर घडवलीस. माझ्या अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मी दहावीच्या सुटीत हा ट्रेक काका व त्याच्या मित्रमैत्रिणींबरोबर केला होता. भिती वाटली होतीच पण मजाही खूप आली. आता इतके समग्र जणू आपण बरोबरच आहोत असे फील देणारे वर्णन वाचून परत जावेसे वाटू लागलेय, जमेल का पण?
धन्यवाद.
Deepak म्हणाले…
@हरेकॄष्णाजी,
आम्हाला गणेश घाट आणि शिडी घाट हे दोनच रस्ते माहित होते... आज आपणाकडुन तिसरा - पेठ कडुन - रस्ता कळाला..!

आभार!
Deepak म्हणाले…
@भानस,
आपल्या आठवणी जाग्या झाल्या... आपणास आनंद झाला... आम्ही आमचा ट्रेक धन्य पावलो!
अजुनही आपणास जमेल... बघा प्रयत्न करुन... "भोले" आहेच पाठीशी!
शुभेच्छा आणि आभार!
HAREKRISHNAJI म्हणाले…
well , there are many more interesting routes to Bhimashanakar, another route is via Siddhagad near Mhasa, Murbad, then from Rajmachi-Dhak route. within Karjat-Khandas region, you will find 3-4 different routes. During rainy season Bhimashankar is heaven
Rohan Wagh म्हणाले…
Mast lihal ahes re...
Mazya hi athavani jagya zalya shidi ghatatlya..
Pan amhi unhalyat gelo hoto..Tevha sagale odhe atale hote..ha ha...ani dusaya divashi amhi nagphaniche tok pan pahile...
baki Pavasalyat parat ekda jajchi icha ahe re...