लफडं!

तो: यार काही तरी मार्ग काढ... डोकं आउट झालंय... झालं ते झालं - आता काय करणार?
मी: मार्ग काय काढ..? पळवाट म्हण... च्यायला.. कुणी सांगीतलं होतं असं लफडं करायला?

गेल्या शनिवारी माझ्याच अगदी जवळच्या मित्राला "सल्ला" हवा होता. मी काय सल्ला देणार?
त्याचं झालं असं -


माझा मित्र "पप्पू" [ खरं नाव विचारुच नका! ] एका चांगल्या आय.टी. कंपनीत चांगल्या हुद्द्यावर काम करतो. गड्याचं लव-मॅरेज झालेलं... अगदी घरातल्यांच्या विरोधात जाऊन - इंटरकास्ट! घरच्यांनीही काही दिवसांनी मान्य करुन दोघांना आशीर्वाद दिले. गेली २-३ वर्षे अगदी सुरळीत संसार चालु असताना गेल्या आठवड्यात त्याचा फोन आला - अगदी महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलायचं आहे - संध्याकाळी घरी ये! मी घरी पोहोचलो... घरी तो एकटाच होता.. म्हणजे वहिनी - माहेरी गेली होती. "गुड न्युज" आहे असं सांगुन अगदी ४ महिन्यांनी ती परत येणार असल्यांच सांगितलं. असो... सांगायचा मुद्दा - किंवा आमच्यातील संभाषण खालील प्रमाने -
तो - यार, तुला एक सांगायचंय... पण समजत नाही कसं सांगु... म्हणजे असं बघ...मी - हां.. हां .. सांग... हळु - हळु... ऐकतोय मी....
तो - अरे माझ्या ऑफिसात एक मुलगी आहे...
मी - एकच?
तो - नाही रे.. ऐकुन तर घे...
मी - हो रे.. तुलाच जरा हलकं वाटावं म्हणुन मस्करी करत होतो.. सविस्तर सांग...
तो - अरे, ती मला फार आवडते आणि मीही तिला... गेल्या एक वर्षापासुन आमचे प्रेम-संबंध आहेत... आम्ही या प्रकरणात फार पुढे गेलो आहोत.. आता ती आपण लग्न करु असं म्हणतेय... तिचा नवरा तिला सहजा-सहजी घटस्फोट देणार नाही आणि माझी बायकोही मला... यार.. मोठ्या अडचणीत सापडलोय... काही तरी मार्ग सुचव ना....

एक दमातच त्यांनं सारं महाभारत दर्शन करवलं!

मी - !!! ... ये भाऊ! आरं काय बोलतोयस काय? लव-मॅरेज झालंय लेका तुझं... ३-४ वर्षापुर्वी घरच्यांच्या विरुध्द जाऊन लग्न केलंस ना... ? आता कुठं सगळं सुरळीत चाललंय तर तुझं हे नवीन लफडं? ..... आणि ऑफिसातली "मुलगी" म्हणास ना तु? मग तिचा नवरा कसा? अरे म्हणजे "ती" सुध्दा लग्न झालेली बाईच आहे? तरीसुद्धा?

तो - हो रे! ... म्हणजे ती माझ्याच प्रोजेक्ट मध्ये आहे.. कधी-कधी ऑफिसला उशिर झाला की तिला घरी ड्रॉप करायला वगैरे जायचो... साला, कधी जवळ आलो ... पाय घसरला... कळालंच नाही... आता ती लग्न करु म्हणतेय... पण "हिला" सोडुन "तिला" हो म्हणायचं ... म्हणजे जरा कसंतरीच वाटतंय!

मी - लेका... कसंतरीच वाटतंय ना... त्यालाच बहुतेक लाज - शरम म्हणत असतील... नशीब, अजुनही तुला तसं वाटतंय! पाय घसरला वगैरे असं काही म्हणू नकोस... च्यायला .. चांगली उडी मारलीत - दोघांनीही! म्हणे - जवळ कसं आलो समजलंच नाही..! ऑफिसात किंवा घरी वहिनीला समजलंय काय?
तो -ऑफिसात समजलं तर काही फरक नाही पडत.. अशी बरीच प्रेम-प्रकरणं तिकडं चालु आहेत... मात्र घरात अजुन समजलं नाही.. पण उगाच मन स्वतःलाच खात होतं.. म्हटलं तुला सांगुन पहावं!
मी - तुझं ऑफिस आहे का - लफडयांची फॅक्टरी? प्रेम-प्रकरणं!!
...........
............................
......................................

तो: यार काही तरी मार्ग काढ... डोकं आउट झालंय... झालं ते झालं - आता काय करणार?
मी: मार्ग काय काढ..? पळवाट म्हण... च्यायला.. कुणी सांगीतलं होतं असं लफडं करायला?
तो: वा रं वा! तुमचं ते प्रेम आणि आमचं ते लफडं होय? - अशी अगाच "आपला तो बाब्या अन् दुसर्‍याचं ते कार्ट" या वाक्प्रचाराची मारतोड करत तो मला "आता काय करु?" असं विचारत होता.

मी: दोस्त, मी प्रेम करुन तिच्याचबरोबरच लग्न केलं - आज इतक्या वर्षांनीही तिच्यावरच प्रेम आहे. लग्नानंतर आपली बायको/ नवरा सोडुन दुसरीवर/ दुसर्‍यावर असणारं प्रेम नसतं, ती एक गरज - अ‍ॅडजस्टमेंट म्हण पाहिजे तर, असते. प्रेम वगैरे काही नाही हां. त्याला "लफडं" म्हणतात, किमान मी तरी अशा प्रकाराला/ प्रकरणाला लफडंच म्हणतो. तूला पाहिजे तर काहीही गोंडस नाव दे!
तो: यार, आता लेक्चर नकोस देऊ. काय करु ते सांग?

मी: काय सांगु ... मला वाटतं - तु वहिनीला विश्वासात घेऊन हे स्वत:हुन सांगावस... रागवेल.. थोडावेळ.. पण सगळं सुरळीत होईल....

माझ्यासाठी असं "लफडं-प्रकरण" काय नवीन नव्हतं.. काही असली प्रकरणं ऐकली आणि पाहिली होतीच.. पण आता मित्रांचं हे प्रकरण म्हणजे डोक्याला चांगलाच वैताग होता... विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे - विवाहित लोकांनीही असं वाहवत जावं का? कामाच्या ठिकाणी मित्र-मैत्रीणी वगैरे असु शकतात - मात्र "पाय-घसरुन पडण्याइतपत" तुम्ही जवळ जाताच कशाला? तुम्ही ऑफिस/ कामाच्या ठिकाणी कामच करता असं तुमची बायको/ तुमचा नवरा समजत असेल ना... त्याचा/ तिचा असा विश्वासघात करणं योग्य आहे का? माझे हे प्रश्न कदाचित त्याला पटले नसावेत...

या प्रश्नांवरही त्याचा युक्तिवाद होताच... म्हणे - तुला असं काही करता आलं नाही म्हणुनच तू या योग्य - अयोग्य, मॉरल्स, कॅरेक्टर्स वगैरेच्या गोष्टी करतोयस.. तुला असा चान्स मिळाला असता तर तु काय सोडला असता का?

आता बोला!!

दोस्त, मला असं काही करायचंच नव्हतं/ नाही... त्यामुळं चान्स मिळणं वगैरे दुरच्या गोष्टी आहेत... आणि हो... तुमचं प्रेम आहे असं म्हटलास ना... आधी.... मग हे "लफडं", "चान्स" की "प्रेम" हे आता तुच ठरव!

च्यायला... आपलं तर डोकं अगदी सुन्न झालंय...

............................. तुम्ही काय सल्ला द्याल?

सदर लेख जरी ओळखीचा - पाहण्यातला वाटला तरी काल्पनीक आहे. काही भाग - कथा - पात्रं यांचा आपल्याशी संबंध जुळतोय असं वाटल्यास - तो केवळ योगायोग समजावा!