स्री. बैलांचा सण: बैल पोळा!

काल पोळा व्हता. हा स्री. बैलांचा सण असल्याने यास "बैल पोळा" पण म्हणत्यात. पण गाईंच्या सणाला "पोळी" म्हणत न्हाईत. पुण्यात चपातीला पोळी म्हणत्यात. पोळा सरावणातल्या आमुशेला येतो. वरिसभर मर-मर काम करणार्‍या स्री. बैलांनला प्रेम दाखविण्यासाठी हयो सण साजरा करत्यात. हायस्कुल संपस्तोवर मी पण बैल होतो त्यामुळे या सणाशी माझी वैयक्तिक जवळीक आहे. तसेच भारत हा शेतकर्यांचा देश असल्याने हा एक राष्ट्रीय सण असावा आनि या दिवशी सर्व्यांना सुट्टी आसावी अशी माझी इच्छा आहे. बैलपोळा हा माज्या माहितीतला - मुक्या प्रान्यांसाठी मानसासारख्या जनावरानं साजरा केलेला एकुलता एक सण आहे.


पोळ्याच्या दिवशी शेतकरी बैलांच्या आदी उठतात. बैलांना नदीवर नायतर वड्यावर नेऊन निरमा लाऊन धुत्यात. शिंगे तासली जातात. नाकात नवी येसण आणि गळ्यात नवा कासरा लावतात. पायची खुरं कापुन पत्री मारत्यात.

आपल्याला नाय का आइ दिवाळीला लवकर उठ्वते आन् मोती साबणानं आंगुळ घालुन नवी कापडं देत्यात. तस या दिवशी बैलांचा लय थाट आसतुय. त्यांनला दिवसभर कामाला लावत न्हाइत. बैलांच्या वशिंडावर हळद व आसेलच तर तेल/ तुप लाऊन मालिश करत्यात. मोठं वशिंड असणारा बैल हा पैलवान बैल असतो. सर्व्या आंगावर रंगाचं नायतर गेरुचं ठिपके देत्यात आन् आपल्या हाताचे शिक्के पण मारत्यात. शिंगावर शेंदुर नायतर इंगुळ लावुन त्यावर रंग-बिरंगी बेगडं चिटकवत्यात. बेगाड लय नाजुक असतं. ते दोर्‍याने कापत्यात व त्याच्या पट्ट्या करुन ते शिंगावर लावत्यात. शिंगाच्या टोकाला चिलिमीसारखे पितळेचे एक इभुषण घालत्यात. ते पडु नये म्हणुन एक - एक मोळा बी मारत्यात. पण त्याच्यानं शिंगातुन रगत येत नाही. त्याच्यावर उभे गोंडे लावतात. गळ्यात चंगाळ बांधतात. चंगाळ घराच्या आडाला बांधल्यामुळे ते धुराने काळं कळ-कुळीत झालेलं असतं. बैलाच्या गळयात बांधाच्या आदी ते निरम्याने धुवावे लागतं. नाही तर पांढर्‍या बैलावर त्याचा काळा रंग लागतो. बैल चालताना त्या चंगळाचा लय मस्त आवाज व्हतो. गळ्यात चंगाळ्याबरोबर कवड्याच्या माळाबी बांधत्यात. पायात काळ्या आन् लाल रंगाचं करदोड्याचं तोडं बांधत्यात. त्यामुळं बैल लय भारी दिसतो आन् तेला द्रुष्ट लागत नाय.. म्हणुन मी अजुनपर्यंत माझ्या पायात काळा करदोडा बांधतो.

पाठीवर नक्शी केलेलं झुल टाकत्यात. आन् त्यां सगळ्याशिनला गावातन वाजवत नेत्यात. त्यांच्या मोरं हालगी वाजणार मस्त ठेका लाउन वाजवत असतो. डांग नाकी कोकणाकी..डांग नाकी कोकणाकी.. ड डांग डांग नाकी कोकणाकी.. असा आवाज आसतोय.

गावातल्या येशीवर सगळी बैलवाली मंडळी गोळा होत्यात .. मग वाजंत्री .. नगारं .. ढोल.. सनया वाजवुन झडत्या म्हणत्यात. जिकणार्‍या पार्टीस सरपंच नायतर पाटील इनाम देत्यात. त्यातपन येकादा आगावपणा करुन भाशनाला उभारतो. बैलाची तारीप करत्यात. आन् पावसा-पान्याच्या गोश्टी पन. पान तंबाकुचं देनं-घेनं होतं आन् मग पोळा फुटतो. मग संद्याकाळी परतीच्या वाटंवर मारतीच्या देवळाला दर्शनाला जात्यात. घरी आल्यावर पुन्यांदा बैलांनला आन् बैलकर्‍यास ववाळतात. बैलाशिनला खायला पुरणाची पोळी आन् सुग्रास - पेंडीचा निवद देत्यात. बैलकर्‍यासबी नवी कापडं मिळत्यात. दिवसबर दोगंबी लय खुशीत असत्यात.

असा हा स्री. बैल पोळा मला लय - लय आवडतो. तुमास्नी बी आवडतच आसल. व्हय ना... मान हालउ नगा... तसं लिव्हा!
मामाच्या गावी पोळा मोठ्या आनंदानं साजरा केला जायचा. " सादया - महादया " ही बैलांची जोडी मनात कायम राहिलेली. अगदी मोटनं पाणी खेचण्यापासुन नांगरणी - पेरणीच्या वेळी नांगरावर बसुन मामाबरोबर - बैलांबरोबर फिरायचो. आज त्या आठवणी पुन्हा दस्तक देऊन गेल्या!

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
मला सादुक पोळा हा सन लय आवडतो. बैल वरीसभर मरमर करत्यात आणि त्यांच्यासती फकस्त एकच दिवस? लय अन्याय हाय ह्यो. माणसागणिक त्यांना पण जास्ती दिस मजा करायला मिळाली पाहिजे.
तुमचा हे लीव्हालेल वाचून आमच्या बैलांची आठवण आली राव. मी लहान असतांना बैल गाया चरायला वाड्यावर घेऊन जायचो. लई मज्जा यायची. पोळ्याच्या दिवशी बैलांना रंग रंगोटी करायची म्हंजी येगळीच मज्जा आस्ते. खर म्हंजी त्यागानिक परीयायचं नसतो नव्ह. देवांना जस आपण पुजतो तसच म्हणा कि. आम्हा शेतकरयासाठी हे देवागानिकच हाईत कि. वर्षात एक तर दिवस मिळतो आम्हाला आन त्या दिवशीच सुख हे एका शेतकऱ्यालाच ठाव हाय. शहरामंदी काय पोळा आन काय शिमगा. सम्द सारखच. कधी पोळ्याचे सुखद क्षण आनुभवायाचे असतील तर या आमच्या गावाकड.
तुमचा हा पोल्याबद्धलचा इचार लय फक्कड हाय. असेच आजून इचार आम्हाला कळवा.
तुमचा शेतकरी भाऊ . . . . . . .
Pankaj - भटकंती Unlimited म्हणाले…
जमलय. आसच लिव्हत र्‍हावा...
Mahendra म्हणाले…
पोळा हा सण आता इतिहास जमा होत आलाय. संपन्न शेतकरी आयुष्यभर बैलांना पाळण्यापेक्षा ट्रॅक्टर,थ्रेशर वापरणं जास्त पसंत करतो.

मोटेने पाणि घालणे, मी माझ्या लहानपणी पाहिलेले आहे. घरी चांभार आला की मोट शिवतांना आम्ही लहान मुलं तासन तास बघत असु.हळु हळू मोट गेली आता बैलजोडी पण जाणार, बैलगाडी पण अगदी फारच कमी प्रमाणात वापरली जाते.

जुने दिवस गेले.. आता नविन दिवस येणार..!!! चेंज ईज इनएव्हिटेबल!! :(
Unknown म्हणाले…
खूपच छान लिहिले आहे . खरोखर या गोष्टी आपल्या पुढच्या पिढी साठी किती अवश्यक आहेत . प्राण्यासाठीची कृतज्ञता या सणा मधून व्यक्त होते . प्राणी देखील आपल्या कुटुंबातील एक घटक आहेत हे किती छान रीतीने रुजले/रुजवले आहे.या सगळ्या गोष्टी पुढच्या पिढीला प्रक्रष्याने कळायला हव्यात . असेच लेख अधूनमधून लिहावेत हि नम्र विनंती
वाट्सरु म्हणाले…
जबरी लिवलय गड्या...आवशीक धिनच्यांग....
Deepak म्हणाले…
@अभय, @पंकज, @महेंद्रजी, @सचिन, @वाटसरु
मंडळी,
आमचं समस्त स्री. बैल मंडळ आपलं मनापसनं आभारी हाय. आपन आसंच आमचं संग र्‍हावा!
सिद्धार्थ म्हणाले…
मित्रा कसलं सही लिहिलं आहेस. जबरदस्त. सगळं कसं डोळ्यासमोर उभं राहील.
विशाल तेलंग्रे म्हणाले…
मी ल्हान (लहान) अस्तान्ना आमी बी गावाकडीच व्हतो सगळे जणं, म्हंजे महे पप्पा, मम्मी अन गुड्डी (मपली भहिन!).. आमच्याकडी बी बैलायची जोडी व्हती, "ढवळ्या-पिवळ्या"! ढवळ्या मव्हा लाडका व्हता, लय मस्त, ढवळाफटक दिसत जाय, अन पिवळ्या साला मारकुंडा व्हता, मोठमोठाले शिंगायवाला..! मी दुसरीमंधी (बौतेक!) अस्तान्ना त्या वर्शीच्या पोळ्यामंधी म्या ढवळ्याला (मी त्येला लाडानं "सोन्या" म्हणत जाय!) धरलं व्हतं, तव्हा, पप्पाच्या हातांधल्या पिवळ्यानं सोन्याला शिंग मारलं व्हतं, तव्हाची ती सोन्याची लाल जखम मला अजुन बी आठोते! लालभडक गेरूनं मी सोन्याला रंगवलं व्हतं (मला जमत नव्हतं तरी बी, तव्हा पप्पानं मला कानफडित मारली नव्हती ते तरी बरं!), आमचं बर्डावरचं (माळावरचं) वावर (मळा!) लाल मातीचं हाये, त्येच्यामुळं गेरूचं टेन्शनच नव्हतं!
लय मजा केली व्हती त्या पोळ्याला मी! सोन्याच्या गळ्यातलं चर्‍हाट घ्युन मी अन सोन्या त्या पोळ्याला गावांमधून ते वाडीपर्यंत खुदडक, खुदडक पळत व्हतो!

त्यानंतर पप्पा इकडं औरंगाबादला आले, तसं मंग आम्हाला बी येणं पडलं! ती बैलायची जोडी पप्पानं मामाला देली व्हती, पण त्यायना ती दुसर्‍याच कोणाला तरी इकून टाकली, तव्हापासून सोन्या मला दिसलाच न्हायी...

त्यो मारकुंडा न्हवता म्हणूनच मला लय आवडत जाय त्यो!

दादा, तुज्ही ही पोश्ट वाचून लय भारी वाटलं... मला त्यो पोळा आठोला!

- विशल्या!
Deepak म्हणाले…
@विशल्या,
लय भारी आटवणी हैत लेका तुज्या.. पर काय बी म्हन, त्या ल्हानपंच्या आटवनी म्हंजी सोनं आसतै बग.. दिवसागनीस त्याची किंमत वाढतच जातीया..
भारीच दीपक भाऊ स्वताबद्दलच्या भावना चांगल्या मांडल्या हायीत तुमी