घनगड


मी: यार, पावसाळा सुरु होण्याआधी आणखी एक ट्रेक मारायचा का?
विशाल: हे काय विचारनं झालं.... शनिवार, ९ जून - घनगड ..!!
मी व इतरः झक्कास..! .... सकाळी ६.३० ला पुणे स्टेशनवर एकत्र यायचे.... पहिली लोकल पकडायची आणि लोणावळा...!

ऑफिसमध्ये ई-मेलचे देवाण्-घेवाण झाले आणि टोळी बनली ८ जणांची .. मी, निखिल, सतिश, कुणाल, राहुल, विशाल, पॅट्रीक आणि पंकज ... शिवाय लोणावळयातुन विशालचे ७ मित्र [... नाही.. भाऊ... चुलत - मावस .. मिळुन..!] .. चांगलीच १५ जणांची टोळी जमली.

शनिवार, ९ जुन ला ठरल्याप्रमाणे सगळे ६.३० ला पुणे स्टेशनवर पोहोचले .. मीच थोडा उशीरा आलो.. नेहमीप्रमाणे... असो..!
लोकलने मस्त गप्पा मारत लोणावळ्यात आलो.. विशाल वाटच पहात होता... सोबत त्याचे भाऊ आणि पुढच्या प्रवासाचे साधन - मालवाहू टेंपो ॥

अगदी ओपन ... आम्हा कोणालाच काहीच अडचण नव्हती.. फक्त राहुलला सोडुन.. गडी आयुष्यात पहिल्यांदाच असा प्रवास करणार होता ... नाखुश होऊन का होईना पण तो गाडीत चढला .... आणि सफर सुरु झाला - चलो घनगड!!

रस्ता ओळखीचा होता .. माझ्या नव्हे ... विशालच्या! लोणावळा - भाबर्डे व्हाया ऍम्बे व्हॅली ...
गप्पा
मारत - मारत घनगडाच्या दिशेने आमची वाटचाल सुरु झाली. रस्त्यात लागणारे ऍम्बे व्हॅली, तेलबैला, नवरा-नवरी [ .. हे दोन डोंगर आहेत :-)] ... सगळे कसे आमच्या स्वागतासाठीच सज्ज होते .. हा हा हा..!
.. भांबार्डे गावात गाडी डोंगराखाली लाऊन आम्ही गड चडायला सुरुवात केली. अरे हो... गाडी लावल्यानंतर तुम्हाला एक पावती घ्यावी लागते.. म्हणजे.. दान करावे लागते.. थोडक्यात - डोंगरावरील देवीच्या मंदिराचा जिर्णोद्धार चालु आहे...!

पहिला थांबा झाला - देवीच्या नवीन मंदिराजवळ.. मंदिर छान आहे ... थंड सावली ... थोडे - थोडे पाणी पिऊन पुढचा प्रवास सुरु...
एव्हाना ...गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या ..
निखिलः यार.. थोडे थांबु या ना..
पॅट्रीकः हा.. दमलास ना...?

निखिलः हो यार... सवय नाही रे.. पहिलाच ट्रेक करतोय ना..
सतिशः वो.. तुम लोगोंको सिगरेट छोडना चाहिये... पुरा दम निगल [निकल??] चुका है...
हा हा हा ... ही ही ही... निखिल बिचारा चुपचाप पुढे चालु लगला...

सतिश हैदराबादचा.. आत्ताच हिंदी शिकायला लागलाय.. केंब्रिजला एकदा जेवण बनवताना याच्या हिंदी ने आम्हाला फार हसवले होते... याचे काम होते कणिक तिंबण्याचे ... झाल्यावर म्हणतो कसा.. "मैने आटा गिला कर दिया है.. अब तुम लोग रोटियां जलावो..!" कल्ला..!!!

विशाल आणि त्याचे भाऊ - मित्र चांगलेच मुरलेले ट्रेकर्स होते.. तसा मी पण जातो ट्रेकला.. पण त्यांचा सारखा अनुभवी नाही... आर्धा गड चडल्यानंतर खरा ट्रेक काय असतो त्याची जाणीव झाली. दगडाचा एक उंच भागा [अंदाजे १५ ते २० फुट] दोराच्या सहाय्याने चढायचा होता.. विशालच्या एका भावाने आधी वर चढुन दोर फिक्स केला आणि आम्ही चढायला सुरुवात केली. कापारीत पाय [पायाची बोटे] फसवुन वर चढायचे..?? खरच अवघड असते राव..!

सतिश, मी, कुणाल आणि पंकज वरती चढलो... वाटले गडावर पोहोचलो...
पण नाही... गडाचा माथा अजुनही वर होता... सतिश आणि पंकजने एक रस्ता शोधला... सतिश आर्ध्या रस्त्यात पोहोचला आणि त्याला दिसले की पुढे रस्ताच नाही... गडी जाग्यावरच खो दिल्या सारखा उभा.. उंची कमी असल्याने त्याला पाय पसरवुन पुढे जाणे किंवा परत खाली येणे ही अशक्य झाले... आर्धा - एक तास हा एकाच जागेवर पुढे झुकुन उभा होता... त्याच्या पाठीमागे आर्ध्या रास्त्यात चढ्लेले कुणाल आणि पंकज एकाच जागी बसुन ...

पॅट्रीक : कुणाल निचे आओ.. ईधरसे रस्ता है...
कुणाल: नही सर.. मै ईधर ठिक हुं..!

एकंदरी हा सिन अगदी नाना पाटेकरच्या प्रहार सिनेमाची आठवण देवुन गेला! कुणाल बिचारा..! आधिच त्याची कॅप्री वर चढताना फाटली होती.. त्यातच त्याला सगळे "फट गई" म्हणुन डिवचत होते..!

थोड्या वेळानी दिपक [विशालचा भाऊ] वरती आला आणि त्याने सतिशला वर चढायला मदत केली.. हळु - हळु.. सगळेच गडावर पोहोचलो!!

गडावर तसे पाहण्यासाठी काहीच नाही... म्हणेजे एक - दोन बुरुज आहेत बस्स! मात्र गडावर चढण्याचा आनंद हा गड जिंकल्याचा !!

वरती पोहोचुन मस्त जेवायला बसलो.. विशाल आणि त्याच्या मित्रांनी आमच्यासाठी ही जेवण आणले होते... आम्ही मात्र काही बिस्कीटे आणि वेफर्स घेवुन गेलो होतो... त्यांनी आणलेल्या पराठे - ब्रेड - जाम ..मस्त ताव मारला... थोडे जोक्स... आणि पुढचा ट्रेक यांच्या गप्पा मारत्-मारत जेवणाचा कार्यक्रम संपला.... एव्हाना ढग जमायला लागले होते... धुके / ढग खालुन वर यायला सुरुवात झाली होती.... आता टेंन्शन होते खाली उतरण्याचे ...!!

पटापट फोटो सेशन करुन आम्ही गड उतरायला सुरुवात केली....

...... उतरण चढाईपेक्षा अवघड वाटायला लागली होती.. निसरडी वाट.. घसरणारे पाय.. आणि त्या बरोबर खाली पडणारे दगड... बापरे! एक दगड विशालच्या कपाळाला आपले नाव सांगुन गेला होता.. थोडी जखमही झाली... पण गडी भारी धिराचा... जणु काहीच झाले नाही अशा सुरात त्याने आम्हाला गड उतरण्यास मदत करायला सुरुवात केली...!

आता परत "तो" दगडी पॅच दोर लावून उतरायचा होता... मी कमरेला दोर बांधला आणि उतरायला सुरुवात केली.. विशालने सांगितेले की शरीर पुर्ण आडवे कर .. दगडाबरोबर ... हो.. सगळे बरोबर.. पण ईकडे माझ्या ** कपाळात गेल्या होत्या... खाली खोल दरी होती आणि सर्व भार त्या दोरावर... आणि तोही वर अडकवलेल्या एका दगडात ढोकल्या खिळ्याला...!! अशा वेळी देव जरुर आठवतो... देवाचे नाव घेऊन आडवा झालो.. अंदाज घेत खाली आलो... नशीब... पाय लट-लटत होते... बाजुला जाउन शांत बसलो...

थोड्या वेळातच सेट झालो.. आता राहुल खाली उतरत होता.. हा बाबा म्हणजे ^-^ ....विचारु नका! .. जे लोक - ट्रेकर्स होते - त्यांना म्हणतो कसा.. "मैने ये पेहले किया हुआ है.. बस्स बहोत दिनों के बाद कर रहा हुं ना... !!" खाली उतरतानाचा याचा आम्ही एक व्ही.डी.ओ. बनवला... बाता मारण्यात पटाइत असणारा हा बहाद्दर खाली उतरताना अक्षरशः आर्ध्यातच बसला! खाली उतरला तेंव्हा याला नीट उभा ही राहता येत नव्हते...

काही वेळातच आम्ही सगळे खाली उतरलो...
विशाल आणि त्याच्या मित्रांनी अक्षरशः लहान मुलांना
सांभाळतात
तसे सर्वांना खाली पर्यंत आणले...
गाडी
परत फिरली आणि आम्ही लोणावळयाची वाट पकडली...!!
परतीच्या लोकलमध्ये गप्पा रंगल्या होत्या...

सतिशः मै जराभी नही डरा था.. बस्स वो उपर जाने का थोडा टेंन्शन था...
कुणालः वो मेरी बस्स कॅप्री फट गई... अगली बार कहां जायेंगे..?
राहुलः बस्स.. जिंदगी मे एकही बार ये करना था.. कर लिया .. फिर कभी नही..
पंकज: मजा आया... और थोडे फोटो खिंचेने के थे..
निखिलः मै तो नेक्स्ट वीक यु.के. जा रहा हुं यार.. आने के बाद कहीं और चलेंगे..
पॅट्रीकः बस्स... ये ट्रेक अपने बस की बात नही है... नेक्स्ट-टाईम तुम लोगही जाओ...!

...... मी मात्र ठरवले होते... पुढचा ट्रेक - जुलै - राजमाची!!


...भुंगा!

टिप्पण्या